Crime: बीड जिल्हा पु्न्हा हादरला आहे. तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरा-बायकोने एका तरुणाची हत्या केली. शिरसाळा जवळील कान्हापूर गावात सदरची घटना घडली. स्वप्निल उर्फ बबलू देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
२ वर्षांपूर्वी स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुखने मार्च 2023 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी स्वप्नील देशमुखवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील देशमुख हा अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुखवर सतत दबाव टाकत होता. या रागातूनच अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुख आणि भावजयी सोनाली देशमुख यांनी स्वप्नीलची हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख हे स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. या दाम्पत्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे ज्या झाडाला अविनाश देशमुखने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच झाडाखाली त्यांनी स्वप्नील देशमुखला संपवलं.