Maharashtra Crime News: राज्यात काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात चार ते पाच जणांनी एका तरुणावर हॉटेलमध्ये घुसून हल्ला केला आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बीड शहरातील मोमिनपुरा भागात दिवसाढवळ्या गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. मोहम्मद खलील राशिद (वय अंदाजे २५-३०) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. नजीब खान उस्मान खान, खिजर खान शरीफ खान यांच्यासह काही जणांनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
आरोपी आणि जखमी एकाच गल्लीत राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोरील रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती. या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील राशिद यांनी केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही संपूर्ण घटना 19 जानेवारी 2025 रोजी हॉटेल शालीमारमध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्यातआरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.