बीड / नगर सह्याद्री –
बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना भावकीतीलच लोकांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड गुन्हेगारीचं हॉटस्पॉट बनलं असल्याचं बोललं जात आहे. अशातच बीडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेतीच्या वादातून चार जणांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथून हा प्रकार उघडकीस आला. शेतीच्या वादातून चार जणांवर अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भावकीतल्याच लोकांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. लोखंडी पाईप, रॉड आणि लाठ्या काठ्याने चार जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं.
दरम्यान, या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या दिसत आहेत. चार जणांवर या शस्त्राचा वापर करून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर नातेवाईक तसेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना रूग्णालयात उपचारासाठी पाठवले.
सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ही मारहाण शेतीच्या वादातूनच झाली आहे की आणखी कोणत्या कारणामुळे? पोलीस नेमकी या प्रकरणावर कोणती कारवाई करणार? हे अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, या घटनेनंतर बीड पुन्हा हादरलं आहे. या मारहाणीच्या घटनांमध्ये कधी आळा बसणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



