Beed Crime: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अवघे काही महिनेच उलटले आहेत. पण तरीही बीडमध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरुच आहे. याचदरम्यान, बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसा एका तरुणाची धारधार कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव आहे. हत्या करणारा आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर नारायण शंकर फफाळ असं आरोपीचं नाव आहे.
माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ भर वस्तीत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. नराधमांना कायदाचा धाक उरलेला आहे की नाही? असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते.
त्या कार्यालयाच्यासमोरच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला.आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. त्यानंतर सपासप वार करून त्याने भरदिवसा या तरुणाची हत्या केली. स्वतः आरोपी नारायण शंकर फफाळ हा माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन त्याने हत्येची कबुली दिली आहे.