मुंबई । सहयाद्री
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे. ५ ते ८ एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर या नऊ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून उकाड्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत या त्रासात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रासह उत्तर-पश्चिम भारतातही उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही उन्हाची तीव्रता जाणवू शकते. IMD ने यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. २०२२ च्या एका अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा भविष्यात अधिक तीव्र आणि वारंवार होणार आहेत.