अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर मधील वसंत टेकडी, सावेडी येथे दोन अनोळखी इसमांनी एका 78 वर्षीय वृद्ध महिलेची पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (26 ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी सुमन मानिक बैरागी (वय 78) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास सुमन बैरागी या घराच्या अंगणात कपडे वाळत घालत असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या कंपाउंडमध्ये आले. त्यांनी “भांड्याची पावडर” विकत असल्याचे सांगून भांडी व दागिने अधिक चमकदार होतात असा दावा केला.त्यातील एकाने घरातील तांब्याचे भांडे स्वच्छ करून दाखवले आणि त्यानंतर बैरागी यांच्या हातातील सोन्याच्या बांगडीवर पावडर घासून ती उजळल्याचे दाखवले. या प्रलोभनाला बळी पडून त्यांनी आपल्या हातातील, गळ्यातील व कानातील सर्व सोन्याचे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून दिले. डब्यावर पावडर टाकून ‘पाच मिनिटांनी उघडा’ असे सांगून दोन्ही इसम पसार झाले.
थोडा वेळाने डबा उघडून पाहिल्यावर त्यामध्ये कोणतेही दागिने आढळले नाहीत. दागिन्यांमध्ये तीन तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या, चार ग्रॅमचे दोन कानातले टॉप आणि दीड तोळ्याची सोन्याची साखळी यांचा समावेश होता. सदर घटनेनंतर वृद्ध दाम्पत्याने घरभर शोध घेतला, मात्र दागिने कुठेच मिळाले नाहीत आणि फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.