अहमदनगर । नगर सह्याद्री
तलाठी भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणारच असल्याचा पुनरुच्चार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी येथे केला. कोणतेही पुरावे न देता बेताल आरोप केल्याने त्याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महसूल विभागाद्वारे सुरू असल्याचेही मंत्री विखेंनी स्पष्ट केले. कोणाचा नातू म्हणून काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेले नाही. आजोबाची परंपरा नातवाने चालवल्याचे दिसते, असा सूचक टोलाही शरद पवारांचे नाव न घेता विखेंनी लगावला.
नगरच्या सावेडी परिसरातील भिस्तबाग चौकात आयोजित महानमो रोजगार मेळाव्याच्या उदघाटनानंतर मंत्री विखेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आ. पवारांवर टीका केली. तलाठी भरतीबाबत बेताल वक्तव्ये त्यांनी केली. पण जाहीर पुरावे मांडले नाहीत. आजोबांची परंपरा चालवण्याचे लायसन्स मिळाले आहे काय? बोलताना भान ठेवले पाहिजे. त्यामुळे आ. पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.
महसूल विभागाद्वारे कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे, असे सांगून विखे म्हणाले, लोकप्रियतेसाठी गौप्यस्फोट करण्याचे म्हणत लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी बेताल आरोप त्यांच्याकडून होत आहेत. पण अजितदादा पवार यांची जशी फसगत झाली, तशी आ. पवारांची फसगत होणार आहे, असा दावाही विखेंनी केला.
जरांगे कोणाची तुतारी वाजवताहेत
मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना आदराचे स्थान दिले आहे. पण मी म्हणजेच मराठा समाज, हे त्यांनी डोयातून काढून टाकले पाहिजे व भावनेशी खेळणे बंद केले पाहिजे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात केलेली विधाने आचारसंहितेला धरून नाहीत, असे स्पष्ट करून मंत्री विखे म्हणाले, तुम्ही म्हणजे समाज नाही. तुमची भूमिकाही समाजाला मान्य नाही. तुमचे खरे रुप मराठा समाजाला समजले आहे. समाजाच्या भावनेवर आरुढ होऊन स्वतःचे इप्सित साध्य करण्याच्या तुमच्या भूमिकेला बळी पडेल इतका मराठा समाज भोळा नाही व समाजात आता तशी जागृतीही सुरू झाली आहे, असा दावाही विखेंनी केला.
चौकशीतून दूध का दूध होईल…
अंतरवली सराटीत झालेल्या लाठीमाराची एसआयटीद्वारे चौकशी योग्यच आहे. जरांगे हे कोणाची तुतारी वाजवत आहेत? त्यांनी हातात कोणाच्या इशार्यावरून मशाल घेतली आहे? तेथे दगडफेक झाल्यावर लगेच कसे जाणते राजे पोहोचले, शिवसेना ठाकरे गटाचे नेते गेले, उद्धव ठाकरे कसे तेथे गेले, हे सारे पाहता तेथे त्यावेळी सारे नियोजनबद्ध घडले आहे. त्यामुळे एसआयटी चौकशीद्वारे सारे दूध का दूध व पानी का पानी होणार आहे. जरांगेची स्क्रिप्ट कोणी लिहून दिली, त्यांचे मोबाईल रेकॉर्ड, दगडफेकीची कारणे सारे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही काही केले नसेल तर घाबरता कशाला?, असा सवालही विखेंनी केला.