Cyber Fraud: मुंबईमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी बनावट संकेतस्थळे तयार करून फसवणूक होत असल्याच्या घटना ताज्या असतानाच, ‘गुगल’ सर्च इंजिनचा वापर करून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या वर्षभरात अशा बनावट संकेतस्थळांसंदर्भात 115 गुन्हे दाखल झाले आहेत.
गुगल सर्च इंजिनवर माहिती शोधताना अनेकजण फसवणुकीला बळी पडत आहेत. गुगलने वापरकर्त्यांना आस्थापनांचे तपशील बदलण्याचा अधिकार दिला आहे, आणि याचाच फायदा घेत काही भामटे बनावट संकेतस्थळे तयार करून लोकांची फसवणूक करत आहेत. ते विविध आस्थापनांचे, बँकांचे, ग्राहक सेवा केंद्रांचे संपर्क क्रमांक बदलून स्वतःचे क्रमांक टाकतात.
जेव्हा एखादी व्यक्ती गुगलवर बँकेचा क्रमांक शोधते, तेव्हा या भामट्यांचा क्रमांक लागतो. ते बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून, बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड तपशील आणि ओटीपी मिळवतात आणि बँक खात्यातून पैसे काढून घेतात. बनावट संकेतस्थळांवर कर्ज योजनांच्या आमिषाने लोकांना वैयक्तिक माहिती भरण्यास भाग पाडले जाते, आणि नंतर ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली पैसे उकळले जातात.
बनावट संकेतस्थळांशी संबंधित 115 गुन्हे नोंदवले गेले आहेत, ज्यापैकी 23 प्रकरणांमध्ये 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात 4 गुन्हे नोंद झाले आहेत. गुगलच्या या गुगलीमुळे नागरिकांना त्रास होत आहे, त्यामुळे सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अधिकृत संकेतस्थळांवरूनच माहिती तपासण्याचा सल्ला दिला आहे.