अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अवैधरित्या वाळू उपसा करणार्या तीन बोटी 115 ब्रास वाळू तसेच वाळू उपसा करण्याचे साहित्य असा एकूण दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केल्याची कारवाई कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे महसूल व तालुका पोलिसांनी बुधवारी दुपारी केली आहे. कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार हेमंत पाटील, प्रफुल्लित सातपुते, जिल्हा खनिकर्म निरीक्षक अशोक कुलथे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह महसूल विभाग व पोलीस कर्मचार्यांनी बुधवारी दुपारी तालुक्यातील मायगाव देवी येथे आपला मोर्चा वळविला.
मायगाव देवी शिवारातील गोदापात्रातून बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. अधिकारी कर्मचार्यांचा लवाजमा आल्याचे पाहताच वाळू तस्करांनी तेथून पळ काढला. त्यानंतर महसूल व पोलिस पथकाने तीन बोटी जाळून नष्ट केल्या. बोटींसाठी लागणारे 80 लिटर डिझेल, जवळपास 150 मोठे पाइप व 115 ब्रास वाळू यावेळी जप्त करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.