spot_img
अहमदनगरबाप्पा गणेशा, जरांगे पाटलांच्या जोडीने तुझंही स्वागत!

बाप्पा गणेशा, जरांगे पाटलांच्या जोडीने तुझंही स्वागत!

spot_img

आयजी कराळे साहेब, वर्षभरापूर्वी तुमच्या डीजे बंदीला तुमच्याच अधिकाऱ्यांनी फाट्यावर मारले! कोण आवर घालणार या डीजे वाल्यांना?

मोरया रे…. / शिवाजी शिर्के

हरतालिकेचं व्रत आणि त्यानंतर लागलीच बाप्पाच्या आगमनाची तयारी यात सारे नगरकर दंगून गेले. विघ्नहर्ता येणार या कल्पनेनेच गेल्या काही दिवसात भक्तीभावाचे वातावरण तयार झाले होते. यावर्षी बाप्पाचं आगमन होत असतानाच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा देखील नगरमध्ये धडकणार! विघ्नहर्ता बाप्पा यावेळीही संवाद साधणार का या प्रश्नार्थक विचारात कार्यालयात आलो तर माझ्या आधीच बाप्पा गणेशा खुर्चीत विराजमान!

मी- (आश्चर्यचकीत नजरेने) बाप्पा, उद्या आगमन होणार आहे ना तुझं? मग आजच कसा?

श्रीगणेशा- (प्रश्नार्थक नजरेने) आजच म्हणजे? अरे रोजच असतो! तुम्ही मला तुमच्या सोयीने घेता!

मी- बरं बाबा, गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वागत आहे तुझं! बाप्पा गणेशा, यावष तुझा उत्सव दणक्यात साजरा करायचं ठरवलंय नगरकरांनी! महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येताहेत!

श्रीगणेशा- म्हणजे कानात बोळे घालूनच यावं लागणार!

मी- बाप्पा, तुझा उत्सव आणि तो सुरु करण्यामागील लोकमान्य टिळकांच्या भावनेला आम्ही कधीच मुठमाती दिलीय रे! तुझ्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही शक्तीप्रदर्शन करण्याची संधी का सोडू?

श्रीगणेशा- संधी तुम्ही कधीच सोडत नाही रे! कालाष्टमी झाली तरी दोन-तीन दिवसांनी तुम्ही दहिहंडी उत्सव आयोजित केलाच! दहिहंडीच्या निमित्ताने पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहणारा शिमगोत्सव देखील मीच याची देही, याची डोळा पाहिला बरं का!

मी- बाप्पा, तू खुपच सिरीअस घेतोस यार! जरा लाईटली घे रे! बाप्पा, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली नगर शहरातील रस्त्यांची कामे अजूनही चालूच आहेत बरं! मागच्या वषही तुला कसरत करत यावं लागलं. आता यावेळी काही प्रमाणात रस्त्यांची कामे झाली आहेत. आयुक्त खमकी भूमिका घेऊन काम करत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हा परिषद सीईओ असे तिघेही अधिकारी यावर्षात नव्याने आलेत! तिघांनी मिळून त्यांच्या त्यांच्या कामांचा धडाका लावलाय.

श्रीगणेशा- लागलास का चापलुसी करायला!

मी- बाप्पा, यात कसली रे चापलुसी?

श्रीगणेशा- मागच्या वष पंकज जावळेची भानगड आठवतेय ना? यावर्षात महसूल, जिल्हा परिषद आणि पोलिस खात्यात लाचखोरीची किती प्रकरणे झाली. सामान्यांना नागवण्याचं दिवसाढवळ्या काम होत असताना त्यावर नियंत्रण का मिळत नाही. माहितीचा अधिकार ज्यांनी आणला त्या अण्णांना हे सारे दिसत नाही का?

मी- बाप्पा, अण्णांच्या बद्दल बोलायचं नाही! ते आमची अस्मिता आहेत.

श्रीगणेशा- अरे बाबा, साऱ्या अपेक्षा तुम्ही अण्णांकडूनच ठेवणार का? अन्यायाच्या विरोधात बोललं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे. अन्याय सहन करणारा पहिला गुन्हेगार असतो असे अण्णा हजारे हेच सांगत आहेत ना! मग, का तुम्ही गप्प? अरे बाबा, उसाच्या शेतातून फक्त चाललं तरी अंगावर आणि कपड्यावर ओरखडे उमटतात! मात्र, उसाच्या शेतातून पळालं तरीही अंगावर एकही ओरखडा उमटलेला दिसला नाही, याचा अर्थ काय घेणार?

मी- बाप्पा, उसाच्या शेताची अन्‌‍ पळण्याची काय भानगड आहे रे?

श्रीगणेशा- वेड्याचं सोंग घेणारच तू! सारं काही समजलंय तुला! मात्र, मी लागलीच काहीही बोलणार नाही! माझं विधीवत आगमन होण्याआधीच तु मला बोलतं करण्याचा आणि कोणावर तरी राग व्यक करण्यास भाग पाडू लागलाय!

मी- बाप्पा, मी कशाला वेड्याचं सोंग घेऊ! खरंतर नगर जिल्ह्याला बऱ्याच कालावधीनंतर उमद्या दमाची टीम आलीय! जिल्हाधिकारी म्हणून पंकज आशिया, जिल्हाधिकारी म्हणून सोमनाथ घार्गेे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आनंद भंडारी असे सामान्य जनतेशी निगडीत तीन नवे कॅप्टन आलेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत देखील चांगली आहे. सोशीक नगरकर म्हणून आमच्या त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा आहेत आणि असणारच! त्या पुर्ण झाल्या की नाही हे आम्ही सोशीक नगरकर कधीच सांगणार नाहीत! कारण, आम्हाला कायम असं वाटतं की शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण शेजारच्याच घरात!

श्रीगणेशा- (मोठ्यांदा हसला!) अरे कधी सोडणार तुम्ही हा सोशिकपणा! नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत! जातीजातीमध्ये तणाव निर्माण होत आहेत आणि त्यातूनच एकमेकांवर गुन्हे दाखल होत आहेत. अरे दिवसाढवळ्या मुडदे पडणारं हे शहर आज कोणत्या दिशेने चाललंय! कायद्याचा धाक तर कधीच संपलाय! उत्सव माझा आणि शक्तीप्रदर्शन तुमच्या डोकं भडकवणाऱ्या नेत्यांचं! आव्वाज खाली नव्हे तर अतिशय वरच्या डेसीबल्समध्ये! पोलिसांच्या दांडक्याची ना भिती ना दहशत! महापालिकेकडून कारवाई हा विषयच नाही! तुला लैच कौतुक आहे ना तुमच्या आयुक्ताचं! त्याहीपेक्षा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना विचार ना नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे काय चालू आहे ते! मध्यंतरी एका प्रभारी अधिकाऱ्याची टीम काम करताना दिसली. पुढे काय! त्याच टीममधील अनेकांनी कशा दुकानदाऱ्या केल्या तेही मांडू का जाहीरपणे! दीड लाखाची लाच घेताना पोलिस अधिकारी पकडला गेला. ही दीड लाख एकट्यासाठी नक्कीच नव्हते. सहायक पोलिस निरीक्षकाचं नाव स्पष्टपणे समोर आले असताना त्याला आरोपी का केले गेले नाही. दंडगव्हाळ नावाचा दुसरा अधिकारी राजरोसपणे हप्ते वसुुली करत सामान्यांना वेठीस धरण्याचे काम करत असताना अशा अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही. वरिष्ठांना वाटा देतो असे जाहीरपणे बोलणारा अधिकारी पहिल्यांदाच नगरमध्ये दिसला! पोलिस अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या सोमनाथ घार्गे यांनी याची कोणती दखल घेतली? कोणाचं किती आणि कसं चालू आहे हेही सांगतो पुढच्या भेटीत!

मी- स्वागत व्हायचंय तुझं अद्याप! त्याआधीच तू चिडून का बोलत आहेस?

श्रीगणेशा- व्वा… किती रे माझ्या आरोग्याची काळजी तुम्हा मंडळींना! तुमच्या विभागाचे म्हणजे परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक असणाऱ्या दत्तात्रय कराळे यांनी मागच्या वषच्या माझ्या उत्सवात डीजे बंदी केली पाहिजे अशी भूमिका घेतली होती. वर्ष सरलं आता! काय झालं त्या डीजे बंदीचं? तुमच्याच नगरचे ते भुमीपुत्र! शिस्तप्रिय आणि खमका अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याचे तूच म्हणाला होतास ना! मग डीजे बंदी तर झालीच नाही. उलटपक्षी डेसीबल्सची मर्यादा ओलांडली गेली. उद्या येताना कापसाचे बोळेच कानात घालून यावं लागणार मला! डीजे बंदीच्या अनुषंगाने आयजी असणाऱ्या कराळे यांना आडवलं कोणी? सर्वोच्च न्यायालयाचे या अनुषंगाने निवाडे आहेत. त्याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाने देखील डीजेवर बंदी बाबत आणि डेसीबल्सबाबत काही नियम घालून दिले आहेत. अनेक डीजे चालक डेसीबल्सचं उल्लंघन करतात आणि हे करण्यासाठी गल्ली- बोळातील टपोरीछाप पुढारी पोलिसांशीही हुज्जत घालतात! अरे सांग तुमच्या कराळे साहेबांना की, आवरा या डीजे वाल्यांना! पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांची डीबेी ब्रँच या साऱ्यांना डीजे चालक कोण, गाडी मालक कोण इथपासून ते त्या मंडळाचा अध्यक्ष, त्याचे पदाधिकारी आणि त्यांना पडद्याआड रसद पुरवणारा गल्लीछाप माहिती असतो. मात्र, यातील कितीजणांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत तुमच्या कराळे साहेबांच्या नाशिक विभागातील टीमने! परवा माझ्या स्वागताच्या निमित्ताने नगरमध्ये डेसीबल्सची मर्यादा ओलांडली गेली. कानठळ्या बसल्या! लेजर लाईटवर बंदी असतानाही पोलिस बंदोबस्तात डीजे वाल्यांनी लेजर लाईट नाचवल्या! कराळे साहेबांच्या नगरमधील पोलिसांनी काही डीजे चालकांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. या यादीवर दस्तुरखुद्द कराळे साहेबांनीच नजर मारण्याची गरज आहे. यातील काही मंडळांचे पदाधिकारी बोगस आहेत. त्या मंडळाचा खरा पदाधिकारी भलताच आहे. याशिवाय मंडळांच्या पदाधिकाऱ्याचे पूर्ण नाव माहिती नाही, असा शेरा मारुन गुन्ह्यात त्याला आरोपी केलंय! कराळे साहेब, हे पटतंय का हो तुम्हाला! फक्त आडनाव टाकून सोपस्कर पूर्ण करणार असाल तर ही कारवाई फक्त कागदीच! कराळे साहेब, या आधीही अनेक उत्सवांमध्ये या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे चालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत! काय झाले ओ, त्या गुन्ह्यांचे! गुन्हे दाखल झाल्याच्या बातम्या वाचल्या की नगरकरांनाही बरं वाटतं! पण, त्यानंतर त्या गुन्ह्यांचे काय होते यासह त्या पदाधिकारी- मंडळ आणि डीजे चालक यासह सारेच पुन्ह्या त्याच जोशात पुन्हा रस्त्यावर आलेलेे दिसून येतात! या कारवाईला काही अर्थ आहे काय? या जिल्ह्याचे तुम्ही भूमिपुत्र आहात म्हणून नगरमध्ये डीजेबंदी साठी आपला दंडुका वापरा! डेसीबल्सची मर्यादा सोडून डीजे वाजतातच कसे याचे कोडे सोडवा!

मी- (बाप्पानं जरा जास्तच अभ्यास केल्याचं मी ताडलं! आता आणखी काही भानगडींवर तो बोलू नये यासाठी मी विषयांतर करण्याचा निर्णय घेतला.) बाप्पा, जरांगे पाटील येताहेत! नगरमधूनच त्यांचा मोर्चा जाणार आहे!

श्रीगणेशा- विषयांतर कसं करायचं हे तुम्हा पत्रकारांना चांगलं जमतं! एखादा विषय अंगलट येतोय असं दिसलं की तुमच्यातील दुसऱ्या पत्रकाराला बोलतं करायचं आणि तिसराच प्रश्न उपस्थित करायचा अन्‌‍ चर्चा तिसरीकडे न्यायची यात तुमचा हातखंडा! नगरमधील कायदा व सुव्यवस्थेसह जिल्ह्यातील एकूणच भानगडींबद्दल बोलणार आहेच मी! तूर्तास आज निघतोय! उद्या पुन्हा भेटू, असं बोलून बाप्पा कार्यालयातून दिसेनासा झाला. मी देखील बाप्पा कोणकोणत्या भानगडींबद्दल बोलणार याचा विचार करत माझ्या कामकाजाला प्रारंभ केला!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहर हादरलं! पोटच्या मुलाने आईला संपवलं, धक्कादायक कारण उजेडात..

Maharashtra Crime News: रएक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांतीनगर परिसरात मुलानेच स्वतःच्या आईची...

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका, आरक्षणाबाबत सरकारने केली मोठी घोषणा

जालना | नगर सह्याद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले...

बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज; मंडळांची तयारी पूर्ण, पहा, फोटो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष रंगू लागला आहे. बाप्पाच्या...

सुपा, ढोकी टोल नाक्यांवरील वसुली थांबवा; ‘यांचा’ प्रशासनाला इशारा

पारनेर। नगर सहयाद्री:- खराब रस्त्यांवर टोल आकारणी नको या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत...