आयुक्तांची बिदागी खरंच जाते का रे सार्यांच्याच वाट्याला? शहरातील ‘काय द्यायचं’ राज्य अ‘मोल’ भाराने वाकलेय का?
मोरया रे | शिवाजी शिर्के
बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज असताना दुसरीकडे जिल्ह्याचं मुख्यालय असणार्या नगर शहरातील पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी दोन-चार दिवस पत्रकार मंडळी (लिहीते पत्रकार) मोर्चेबांधणी करत होती. त्यात आम्ही कसे मागे राहणार! लोकशाहीच्या नावाने जागर झाला आणि वीस- एकवीस वर्षानंतर मतदानाची आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. हरतालिकेचं व्रत आणि त्यानंतर लागलीच बाप्पाच्या आगमनाची तयारी यात सारेच दंगून गेले होते. विघ्नहर्ता येणार या कल्पनेनेच सर्वत्र वेगळेच वातावरण तयार झाले होते. मी त्याला अपवाद कसा असेल? कार्यालयात आलो तर माझ्या आधीच खुर्चीत साक्षात बाप्पा विराजमान!
मी- (आश्चर्यचकीत नजरेने) बाप्पा, उद्या आगमन होणार आहे ना तुझं? मग आजच कसा?
श्रीगणेशा- (प्रश्नार्थक नजरेने) आजच म्हणजे? अरे रोजच असतो! तुम्ही मला तुमच्या सोयीने घेता!
मी- बरं बाबा, गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वागत आहे तुझं!
श्रीगणेशा- पुढच्या वर्षी लवकर या, असं तुम्ही सारेच ओरडून आवाहन करत होते ना! मग, आलो मी!
मी- बाप्पा गणेशा, यावर्षी तुझा उत्सव दणक्यात साजरा करायचं ठरवलंय नगरकरांनी! लोकसभा झालीय आणि विधानसभा येतेय! संधी सोडणार नाही आम्ही तुझ्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याची!
श्रीगणेशा- संधी तुम्ही कधीच सोडत नाही रे! कालाष्टमी झाली तरी दोन-तीन दिवसांनी तुम्ही दहिहंडी उत्सव आयोजित केलाच! दहिहंडीच्या निमित्ताने पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहणारा शिमगोत्सव देखील मीच याची देही, याची डोळा पाहिला बरं का!
मी- बाप्पा, तू खुपच सिरीअस घेतोस यार! जरा लाईटली घे यार! पोलिसांना कोणीही शिव्या दिल्या नाहीत! वेळ वाढवून मागितली इतकेच! तुुला कोणीतरी चुकीची माहिती दिलीय!
श्रीगणेशा- इतकाही मी कानफाट्या नाही बरं का! जाऊ दे, तुम्हा नगरकरांना दहिहंडीतील तो शिमगोत्सव आवडला असेल तर मला त्याचं काय? तसंही तुम्हाला कधी काय आवडेल हे कळेनासे झाले आहे.
मी- बाप्पा, नगरमध्ये यावेळी रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत! त्यामुळे तुला येताना जरा कसरतच करावी लागेल! आयुक्त देखील आता नव्याने आले आहेत. त्यांचं देखील काम चांगले आहे बरं का?
श्रीगणेशा- लागलास का चापलुसी करायला! नगरमध्ये आलेले आयुक्त यापूर्वी नगरमध्ये होते हे मला माहितीय! पूर्वी येथे असताना त्यांनी काय केले आणि काय नाही याचा सातबारा आहे माझ्याकडे! पण, त्याआधीचे आयुक्त पंकज जावळे सध्या कुठं आहेत रे?
मी- (पंकज जावळे यांची चौकशी करणार्या बाप्पाच्या प्रश्नाने माझी भंबेरीच उडाली! बाप्पाला कसं सांगावं की ते लाचेच्या प्रकरणात अडकलेत!) काहीच न बोलता मी बाप्पाकडे पाहत होतो आणि विचारचक्र चालू होते.
श्रीगणेशा- लाचेच्या प्रकरणात पंकज जावळे अडकला हे सांगायला तुला लाज वाटते का? त्याची पाकीटे सार्यांनाच जात होती! राजकीय नेतेमंडळींसह तुम्हा पत्रकारांना देखील मिळत होती का?
मी- (क्षणाचाही विचार न करता) बाप्पा, काहीही आरोप करु नकोस! नेते मंडळींचे मला माहिती नाही! पण, नगरच्या पत्रकारीतेला डाव्या- उजव्या विचारधारेचा वारसा आहे. मोठा इतिहास आहे. जावळे चांगले अधिकारी होते इतकेच मला म्हणायचे होते! त्यांच्यावर आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकावर लाचेचा ट्रॅप झाला हे खरं आहे. त्यांच्या जागी आता यशवंत डांगे हे नवे आयुक्त आले आहेत! ते चांगले काम करत आहेत इतकेच!
श्रीगणेशा- तुला आठवतंय का? जावळेंच्या बाबतही तुम्हा पत्रकार मंडळींचं हेच उत्तर होतं. काय झालं त्या जावळेंचं हे तुम्हा मंडळींनाच माहिती! आता डांगे साहेब आलेत! व्यक्ती तीच आहे! फक्त त्याचे अधिकार बदलले आहेत. अतिरिक्त आयुक्त पदावरुन आता आयुक्त म्हणून काम पाहू लागलेत! नगर शहर, येथील तुम्हा नगरकरांची मानसिकता आणि महापालिकेचा खडानखडा हे सारं डांगेंना माहितीय! उसाच्या शेतातून फक्त चाललं तरी अंगावर आणि कपड्यावर ओरखडे उमटतात! मात्र, उसाच्या शेतातून पळालं तरीही अंगावर एकही ओरखडा उमटलेला दिसला नाही, याचा अर्थ काय घेणार?
मी- बाप्पा, उसाच्या शेताची अन् पळण्याची काय भानगड आहे रे?
श्रीगणेशा- वेड्याचं सोंग घेणारच तू! सारं काही समजलंय तुला! मात्र, मी लागलीच काहीही बोलणार नाही! माझं विधीवत आगमन होण्याआधीच तु मला बोलतं करण्याचा आणि कोणावर तरी राग व्यक करण्यास भाग पाडत आहे, असें मला वाटू लागले आहे.
मी- बाप्पा, मी कशाला वेड्याचं सोंग घेऊ! खरंतर नगर शहराला बर्याच कालावधीनंतर तरुण, उमद्या दमाचा आयुक्त भेटलाय! नगरकर म्हणून आमच्या त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा असणारच! त्या पुर्ण झाल्या की नाही हे आम्ही सोशीक नगरकर कधीच सांगणार नाहीत! कारण, आम्हाला कायम असं वाटतं की शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण शेजारच्याच घरात!
श्रीगणेशा- (मोठ्यांदा हसला!) अरे कधी सोडणार तुम्ही हा सोशिकपणा! नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत! जातीजातीमध्ये तणाव निर्माण होत आहेत आणि त्यातूनच एकमेकांवर गुन्हे दाखल होत आहेत. अरे दिवसाढवळ्या मुडदे पडणारं हे शहर आज कोणत्या दिशेने चाललंय! कायद्याचा धाक तर कधीच संपलाय! उत्सव माझा आणि शक्तीप्रदर्शन तुमच्या डोकं भडकवणार्या नेत्यांचं! त्या नेत्याच्या पिलावळीचं! आव्वाज खाली नव्हे तर अतिशय वरच्या डेसीबल्समध्ये! पोलिसांच्या दांडक्याची ना भिती ना दहशत! महापालिकेकडून कारवाई हा विषयच नाही! तुला लैच कौतुक आहे ना तुमच्या आयुक्ताचं! त्याहीपेक्षा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना विचार ना नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे काय चालू आहे ते! उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी नगरमध्ये काम पाहत आहे ना! सध्या त्यांची टीम काय करते याची वेगळीच डायरी मांडतो! कोणाचं किती आणि कसं चालू आहे हेही सांगतो पुढच्या भेटीत! पण,
महापालिकेच्या आयुक्तांचं बोल ना आधी!
मी- होय, आमचे महापालिका आयुक्त प्रचंड उमद्या दमाचे आणि प्रचंड निर्णयक्षमता असणारे आहेत.
श्रीगणेशा- हो… का! मुद्यावरच येतो! महापालिकेतील टाऊन प्लॅनच्या फाईल्सचे रेट काय आहेत? ठेकेदारांची जुनी पेंडीगं बील रखडलीत हे खरे का? एका खात्यावरील रक्कम दुसर्या खात्यावर बेकायदेशिरपणे ट्रान्सफर केली जाते आणि पुढे त्याची विल्हेवाट लावली जाते हे खरे की खोटे? बिल्डींग बांधकाम परवानगीसाठी आजही नैवद्य दाखवावा लागतो हे खरे की खोटे? खरं सांगू, अशा अनेक भानगडींमुळेच त्या पकज जावळेवर ‘खाट’ पडली रे! हे सारं दिवसाढवळ्या दरोड्याचं काम चालत असताना सोशिक नगरकर गप्प बसून आहेत हेही खरे की खोटे? काही मंडळींना न चुकता दर महिन्याला जावळेंच्या कालावधीत पोहोच होणारी आता देखील चालूृ असल्याचं बोललं जातं हे खरं की खोटं!
मी- बाप्पा, खर्या खोट्याचा विषय नाही हा! आमच्या महापालिकेत पारदर्शी काम केलं जातंय इतकंच!
श्रीगणेशा- होय रे बाबा! खुपच पारदर्शी! पंकज जावळेंच्या कालावधीत कोट, जाकीट महाालिकेत लुटण्याचं काम कसं झालं हे मला माहितीयं! जावळे याने गोड हसून सर्वांना वाटेला लावून नगर शहराला धुवून खालं. त्यावेळी महापौर- उपमहापौर हे पदाधिकारी होते! तरीही बेटा घाबरला नाही! आता तर कोणीच नाही! प्रशासक राज!
मी- (बाप्पानं जरा जास्तच अभ्यास केल्याचं मी ताडलं! आता आणखी काही भानगडींवर तो बोलू नये यासाठी मी विषयांतर करण्याचा निर्णय घेतला.) बाप्पा, नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत तू बोलत होतास! आमचे पोलिस उप अधीक्षक अमोल भारती हे तरुण तडफदार आहेत. त्यांच्या कामाचा आवाकाही चांगला आहे.
श्रीगणेशा- विषयांतर कसं करायचं हे तुम्हा पत्रकारांना चांगलं जमतं! एखादा विषय अंगलट येतोय असं दिसलं की तुमच्यातील दुसर्या पत्रकाराला बोलतं करायचं आणि तिसराच प्रश्न उपस्थित करायचा अन् चर्चा तिसरीकडे न्यायची असं झालं हे आता! अमोल भारती आणि त्यांच्या टिमबद्दल, नगरमधील कायदा व सुव्यवस्थेसह जिल्ह्यातील एकूणच घडामोडींबद्दल बोलणार आहेच मी! तूर्तास आज निघतोय! उद्या पुन्हा भेटू, असं बोलून बाप्पा कार्यालयातून दिसेनासा झाला. मी देखील माझ्या कामकाजाला प्रारंभ केला!