नांदेड / नगर सह्याद्री –
मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानंतर राज्यातील बंजारा समाज देखील आक्रमक झाला असून एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे आंदोलन सुरु आहे. यात आज नांदेड आणि वाशीममध्ये बंजारा समाजाकडून महाएल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लाखो बंजारा बांधव सहभागी झाले होते.
एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. यासाठी आज नांदेडमध्ये महाएल्गार मोर्चा काढण्यात आला होता. मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार देण्यात येत आरक्षणानुसार बंजारा समाजाचा देखील एसटी प्रवर्गात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी आहे. यासाठी मागील महिनाभरापासून आंदोलन सुरु असून आज पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात आला.
नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात लाखो बंजारा बांधव सहभागी झाले असून नांदेड जिल्ह्यातील तालुकास्तरावरील मोर्चा नंतर आता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. यावेळी समाज बांधवानी आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे.
वाशिममध्ये विराट मोर्चा
वाशीम : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वाशिममध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झालाच पाहिजे, या मागणीला घेऊन बंजारा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीपासून या मोर्चाला सुरुवात झाली. हजारोच्या संख्येने बंजारा समाजातील महिला व पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात बंजारा समाजाच्या महिला पारंपारिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.