शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले. मात्र, जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांना बंडाचा सामना करावा लागत आहे. उमेदवारी मिळाल्याचा आनंद असला तरी स्वकीयांनी हाती घेतलेला बंडाचा झेंडा आणि जाहीरपणे व्यक्त केलेली नाराजी आता अडचणीची ठरू लागली आहे. कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही स्वीकारु असे जाहीरपणे सांगणाऱ्या नगर शहरातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी अभिषेक कळमकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेत. नेवासात शिवसैनिकांना जराही विश्वासात न घेता विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर केली. तिकडे श्रीगोंद्यात दोन तासात उमेदवारी मिळविलेल्या अनुराधा नागवडे यांना कोणीच स्वीकारायला तयार नाहीत. श्रीरामपूरमध्ये हेमंत ओगले यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात जाऊन दिल्लीतून उमेदवारी मिळवली असली तरी श्रीरामपूरकरांना ती पचणी पडायला तयार नाही. पारनेरमध्ये काशिनाथ दाते यांना उमेदवारी मिळाली असताना अपेक्षेप्रमाणे त्यांच्या उमेदवारीस विरोध सुरू झाला आहे. यातून अनेकांनी बंडाचे निशाण फडकवले असले तरी उमेदवारी माघारी घेण्याच्या क्षणापर्यंत मानापमान नाट्य राहणार हे नक्की! त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
नेवाशात विठ्ठलरावांचं धनुष्यबाण!
महायुतीत नेवासा मतदारसंघाची जागा भाजपाकडे असतानाही त्या जागेवर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या विठ्ठलराव लंघे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेवासा तालुक्यातील कोणत्याही शिवसेना पदाधिकाऱ्याशी संवाद न साधता एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलीच कशी असा प्रश्न नेवासा तालुक्यातील शिवसैनिकांना पडला आहे. नेवासा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या शंकरराव गडाख यांच्या विरोधात कोण असा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत होता. गडाख यांच्या विरोधात तगडा उमेदवार असेल असे बोलले जात होते. त्यानुसार अनेक बड्या उद्योजकांची नावे देखील चर्चेत होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारांच्या यादीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या विठ्ठलराव लंघे यांचे नाव जाहीर करण्यात आले. लंघे यांना धनुष्यबाणाची उमेदवारी जाहीर होताच अनेकांना आश्चर्य वाटले. विठ्ठलराव लंघे यांच्याकडून स्थानिक शिवसैनिकांना कधीही विश्वासात घेण्याचे काम झाले नाही. उलटपक्षी शिवसैनिकांना त्रास देण्याचे कामच लंघे यांनी केले. आता त्यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांच्या विरोधात मोठे जनमत आहे.महायुतीच्या कार्यकर्त्यांनी लंघे यांच्या शिवसेना उमेदवारीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
नगरमध्ये एकाकी पडलेला अभिषेक!
नगर शहरातून अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण याचा शोध शेवटच्या दिवशी संपला असला तरी नक्की भिडू कोण हा प्रश्न जगताप समर्थकांना कायम आहे. अभिषेक कळमकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे किरण काळे, शिवसेना उबाठा गटाचे शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीही उमेदवारी दाखल केली. आता शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख राहिलेल्या नगर शहरात यावेळी शिवसेना बेदखल झाली आहे. कोतकर यांच्या मविआतील संभाव्य उमेदवारीला लेखी विरोध करताना आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या अशी भूमिका घेतली गेली. यानंतर कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असता लागलीच त्याबाबत नाराजी व्यक्त करत गाडे, फुलसौंदर, काळे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. कळमकर हे त्यातून एकाकी पडले. बंडाचे निशाण या साऱ्यांनी खाली ठेवले तरी आता दुभंगलेली मने एकत्र येणार का आणि आलीच एकत्र तर नगरकरांमध्ये आज या साऱ्यांच्याबद्दल निर्माण झालेली संशयाची भावना कमी होणार का हा खरा प्रश्न आहे.
त्यांचा प्रचार नीलेश लंके करणार का?
लोकसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे- अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंद्यात नीलेश लंके यांना जोरदार विरोध केला होता. राहुल जगताप यांनी प्रामाणिक भूमिका घेतली आणि लंके यांना साथ दिली. अनुराधा नागवडे यांना मविआतील शिवसेनेने उमेदवारी दिली. आता त्यांचा प्रचार खा. लंके हे करणार का याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. नागवडे यांचे विश्वासू मार्गदर्शक अशी भूमिका बजावणाऱ्या बाबासाहेब भोस यांच्या निवासस्थानी नागवडे दांपत्याने खा. लंके यांची गुप्त भेट घेतली. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले आणि उमेदवारी मिळवून माघारी आले. लंके यांच्या मताधिक्यासाठी जीवाने रान करणारे राहुल जगताप व त्यांच्या समर्थकांना लंके हे वाऱ्यावर सोडणार की जगताप यांना साथ देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
उमेदवारी नागवडेंना, सहानुभूती राहुल जगतापांना!
अडचणीतील कुकडी कारखान्यासाठी लोकसभा निवडणुकीत 138 कोटींची मदतीची ऑफर धुडकावून शरद पवार यांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही अशी ठाम भूमिका घेणाऱ्या राहुल जगताप यांना मविआची उमेदवारी मिळाली नाही. दोन तासात शिवसेनेत प्रवेश आणि लागलीच उमेदवारी असा झटपट निर्णय नागवडेंच्या बाजूने झाला! मात्र, हा निर्णय होताना व्यवहार झाल्याची चर्चा झडली. व्यवहारातील आकडे खोक्याचे ठरले. स्थानिक शिवसैनिकांच्या नाकावर टिच्चून उमेदवारी मिळवल्यानंतर नागवडेंचे विमान एकदम हवेत गेले. या उमेदवारीसाठी मध्यस्थी करणाऱ्यांनी तर काहींना थेट राज्यसभेचे गाजर दाखवत बोली लावायला सुरुवात केली. पैशाच्या जिवावर सारे काही आपण करू शकतो ही राजेंद्र नागवडे यांच्या मनातील भावना आता साऱ्यांनाच डोईजड वाटू लागली आहे. त्यातूनच भाजपाच्या महायुती आणि मविआ असा सामना रंगण्याऐवजी आता महायुतीचे पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यातच सामना रंगणार असे पहिल्या टप्प्यातील चित्र आहे. राहुल जगताप यांच्यावर झालेला अन्याय आणि अडचणीच्या काळात 138 कोटींना लाथ मारत पवारांना दिलेली साथ हीच त्यांच्या जमेची बाजू असणार आहे.
पारनेरमधील बंडाळी नीलेश लंकेंच्या पथ्यावर तर दातेंची ठरू शकते डोकेदुखी!
खा. नीलेश लंके यांच्या होमग्राऊंडवर राणी लंके यांच्या विरोधात कोण याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. सुजित झावरे, काशिनाथ दाते, विजू औटी यांची नावे चर्चेत असताना माजी आमदार विजय औटी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर काशिनाथ दाते यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी जाहीर झाली. दाते यांचे नाव जाहीर होताच सुजित झावरे यांनी अपेक्षेप्रमाणे सवता सुभा मांडला. त्यांचा हा सवता सुभा शेवटपर्यंत राहतो की तलवार म्यान होते यावर दाते यांचे भवितव्य असणार आहे. याशिवाय सेनेने येथील जागा मागितली असताना त्यावर काहीच निर्णय झाला नाही. डॉ. श्रीकांत पठारे आणि संदेश कार्ले यांनी बंडाची भूमिका घेतली असली तरी शेवटच्या क्षणी डॉ. पठारे माघार घेण्याची अधिक शक्यता आहे. शिवसेनेचे नाराजीनाट्य चालू असताना अळकुटीच्या डॉ. भास्कर शिरोळे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या किती जनमत आहे यापेक्षा त्यांनी डॉ. पठारे- कार्ले यांच्या भूमिकेला छेद दिला. माघारीनंतर कोण- कोण मैदानात राहते आणि मैदान सोडलेले कोणाच्या पायात पाय घालतात यावर राणी लंके यांची गणिते अवलंबून असणार आहेत.
श्रीरामपूरच्या उमेदवारीत बाळासाहेब थोरात यांना डावलल्याची भावना!
श्रीरामपूरमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी टाळली. कानडे हे राज्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू आणि खास गोटातील. मात्र, असे असताना त्यांची उमेदवारी कापली गेली. हेमंत ओगले यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. ही उमेदवारी देताना बाळासाहेब थोरात यांना विश्वासात न घेता त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्यावर कुरघोडी केली. ओगले यांची उमेदवारी आली असली तरी त्यांना निवडून आणण्यासाठी पराकाष्टा करावी लागणार आहे. काँगेंसने हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली असताना लहू कानडे यांना अजित पवार गटाने पावन करून घेतले. कानडे यांनी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने ओगले यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याच जिल्ह्यात त्यांच्या विचाराला डावलून दिल्लीतून उमेदवारी देण्यात थोरात विरोधक यशस्वी झाल्याचे मानले जाते.
श्रीरामपूरच्या उमेदवारीत बाळासाहेब थोरात यांना डावलल्याची भावना!
श्रीरामपूरमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी टाळली. कानडे हे राज्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू आणि खास गोटातील. मात्र, असे असताना त्यांची उमेदवारी कापली गेली. हेमंत ओगले यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. ही उमेदवारी देताना बाळासाहेब थोरात यांना विश्वासात न घेता त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्यावर कुरघोडी केली. ओगले यांची उमेदवारी आली असली तरी त्यांना निवडून आणण्यासाठी पराकाष्टा करावी लागणार आहे. काँगेंसने हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली असताना लहू कानडे यांना अजित पवार गटाने पावन करून घेतले. कानडे यांनी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने ओगले यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याच जिल्ह्यात त्यांच्या विचाराला डावलून दिल्लीतून उमेदवारी देण्यात थोरात विरोधक यशस्वी झाल्याचे मानले जाते.