Tiger Attack: गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत शेतकऱ्याचे नाव मधुकर राउत (वय ५५) असे असून, ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे. स्थानिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर राऊत हे सकाळी चारा आणण्यासाठी शेतात गेले होते, मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी जंगलात शोध सुरू केला. शोधादरम्यान, त्यांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून तब्बल दीड किलोमीटर जंगलात ओढत नेल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या घटनेमुळे पारशिवानी तालुक्यातील कालभैरव पेठ परिसरात भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत सहा लोकांचा बळी वाघाच्या हल्ल्यात गेला आहे.आम्हाला दररोज जीव मुठीत घेऊन शेतात जावं लागतं. किती माणसांचे बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. स्थानिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.