अहमदनगर | नगर सह्याद्री
मागील वर्षीच्याअल्पवृष्टीने आणि त्यातून निर्माण झालेल्या दुष्काळाने होरपळलेल्या नगर जिल्ह्यावर यंदा सुरुवातीलाच मृग नक्षत्राने प्रसन्न होऊन बरसात केल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांसह सर्वच घटकांतील नागरिक सुखावले आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांत गेल्या रविवारी जोराचा पाऊस झाल्याने छोटेमोठे नदीनाले भरून वाहिले. खरिपाच्या पेरणीला हा पाऊस पोषक असल्याने वापसा येताच शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी बी-बियाणे, खते यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकरी फिरताना दिसत आहे.
मृग नक्षत्र गेल्या ०७ जूनला सुरू झाले आणि नगर जिल्ह्यात आकाश ढगांनी झाकोळले जाऊन पावसाच्या छोट्यामोठ्या सरीही कोसळू लागल्या; परंतु गेल्या रविवार ०९ जून रोजी जिल्ह्याच्या बर्याच भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने हा पाऊस खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरला आहे. काही भागात छोट्यामोठ्या पाझर तलवांत पाणीही बर्यापैकी साचले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. नगर (३९.५), पारनेर (६३.४), श्रीगोंदा (५५.८), कर्जत (५०), जामखेड (२६.७), शेवगाव (४२.२), पाथर्डी (७७.८), नेवासा (५५.६), राहुरी (३६.२), संगमनेर (१३.७), अकोले (१३.१), कोपरगाव (२७.८), श्रीरामपूर (४५.६), राहाता (३९.६). संपूर्ण जिल्ह्याची पावसाची सरासरी ४२.८ मिलीमीटर आहे.
दरम्यान पुढील तीन ते चार तासांनंतर राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचा इशारा आयएमडीेने (इंडिया मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट) दिला आहे. नगर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकर्यांची खरीप बी-बियाण्यांचया खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू आहे. बी-बियाणे काळ्याबाजारात चढ्या भावाने विकले जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेने उपाययोजना कराव्यात असे शेतकर्यांतून बोलले जात आहे.