अहमदनगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच काँग्रेसचा तरूण चेहरा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी हे अजित पवार गटात प्रवेश करतील असे बोलले जात आहे. कारण राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दिकी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. जनसन्मान यात्रेमध्ये शेकडो तरूणांना घेऊन झिशान सिद्दिकी बाईक रॅली करणार असल्याचे कळतंय. त्यामुळे झिशान यांच्या अजित पवार गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसते. यावर माजी मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे.
आम्हाला काही गोष्टी यापूर्वीच माहीत होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत कोणी सोडून गेले तर त्याचा फायदाच झाला. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडला तर त्याचा आम्हाला फायदा होतो असा आमचा अनुभव आहे. नांदेडचे बडे नेते भाजपत गेले. मात्र सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे हे दिसून आले. नांदेडची जागा आम्ही जिंकली. काँग्रेस हा एक विचार म्हणून असलेला पक्ष त्यामुळे कोण गेले याचा विचार आम्ही करत नाही. कोणी सोडून गेले तर आम्ही त्या ठिकाणी जोमाने उभे राहतो, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
विधानसभा निवडणूकीवर देखील बाळासाहेब थोरातांनी भाष्य केले. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मात्र ती सुद्धा कोणाच्या प्रभावात जाणे हे देशाच्या हिताचे नाही. आधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेतल्या नाहीत. आता विधानसभा सुद्धा लांबणीवर जाते. टी. एन. शेषन यांच्या काळात सत्ताधारी देखील घाबरत होते. मात्र आता सगळे उलट सुरू आहे. निवडणुका पुढे ढकलून सरकारी खर्चातून राजकीय प्रचार सध्या सुरू आहे. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. जनतेला हे आवडणार नाही, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.