बैल पोळा उत्साहात साजरा / मानाच्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
येथे आपल्या शेतात वर्षभर राबणार्या बैलजोडीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणी पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावात कुठलीही मोठी यात्रा नसल्याने गावचा पोळा हीच गावासाठी मोठी यात्रा असते.
आधुनिकीकरणांमुळे शेतीकामांसाठी ट्रॅटरचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने बैलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. अशा परिस्थितीत देखील आपल्या बैलाचे चांगल्या प्रकारे संगोपन करून त्यांना मिरवणुकीत सहभागी करणार्या सर्व शेतकर्यांचा यात्रा समितीच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला. सायंकाळी सुभाष ठुबे पाटील यांच्या मानाच्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली गेली. ही मानाची जोडी मारुतीच्या पाराला प्रदक्षिणा घालून आल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. हौशी शेतकर्यांनी आपल्या बैलासमोर नाचण्यासाठी नृत्यांगना हिंदवी पाटील व इतर नृत्यांगना देखील आणण्यात आल्या होत्या. त्यांनी आपल्या कलेने रसिक प्रेक्षकांना ताल धरायला लावला. बारीमालकांने पारंपरिक वेशात व शिस्तबद्ध पद्धतीने सादरीकरण केल्याने यात्रा समितीच्या वतीने सर्व बारीमालकांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
बैल पोळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. बैल पोळ्यानिमित्त दुसर्या दिवशी गावांत गौराईची यात्रा भरते. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात पाळणे, विविध गृहोपयोगी वस्तूंचे, स्वादिष्ट मिठाईचे दुकाने मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहेत. दुसर्या दिवशी गौराईची वाजत गाजत मिरवणूक काढली जाती व लाल मातीत कुस्त्यांचा जंगी आखाडा होतो. पोलीस उपनिरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या वतीने वाहतूकीचे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. यात्रे मध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. यात्रा समितीकडे स्वेच्छेने गावांतील नागरिक आपली लोक वर्गणी आणून जमा करतात.