अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर शहरातील एका प्राथमिक शाळेजवळ गेटलगत ताक विकणार्या इसमाने शाळकरी मुलींना गेल्या महिन्याभरापासून त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका पीडित मुलीच्या वडिलाने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैभव बबन हुच्चे (रा. माळीवाडा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची 10 वर्षीय मुलगी अहिल्यानगर शहरातील एका प्राथमिक शाळेत शिकत असून ती शाळेत रोज सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिक्षण घेते. 23 एप्रिल रोजी रात्री 9.30 च्या सुमारास मुलगी रडत घरी आली व तिने वडिलांना सांगितले की, शाळेजवळ ताक विकणारा एक इसम मागील महिन्यापासून तिच्या व तिच्या मैत्रिणींना बॅड टच करतो. याबाबत घरी कोणाला सांगू नकोस, असे धमकावतो.
या प्रकाराची खात्री करण्यासाठी दुसर्या दिवशी, 24 एप्रिल रोजी सकाळी 11.45 वाजता फिर्यादी शाळेजवळ थांबले. शाळा सुटल्यानंतर त्यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह शाळे बाहेर येत असताना ताकविक्रेता इसमाने पुन्हा गैरवर्तन केल्याचे आढळून आले. यावेळी फिर्यादीने त्याला जाब विचारला असता संबंधित इसमाने त्यांच्या अंगावर धावून जात त्यांची गचंडी पकडून भांडण केले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला व शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव वैभव बबन हुच्चे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.