पारनेर / नगर सह्याद्री –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी हा लढा आता प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चाला’ राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. या मोर्चाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पाठिंबा दिला असून हा मोर्चा आज नागपूरच्या दिशेने रवाना झाला आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. काही वेळ वाट पाहणार आहोत नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार, असा अल्टिमेटम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेतून दिला आहे. या पत्रकार परिषदेस किसान सभेचे अजित नवले, भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले की, घराघरातून प्रत्येक शेतकरी जात, पात, पंथ, पक्ष बाजूला ठेवून येणार आहे. काल मुख्यमंत्री साहेबांशी आमची मेसेजद्वारे चर्चा झाली आहे. त्यांना आम्ही सांगितले की, आज आम्ही येऊ शकत नाही. एक ते दीड लाख लोक नागपूरकडे येणार आहेत. आम्ही जर तिकडे गेलो तर इथले नेतृत्व कोण करणार, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, आम्ही आमचे मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे. त्यांनी तीन ते चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. कारण ही एक-दोन दिवसाची लढाई नाही. आम्ही रायगडपासून उपोषण सुरू केला तेव्हापासून ही लढाई सुरू आहे. आम्ही आत्ताच मुद्दे उपस्थित केलेले नाहीत. आम्ही चार ते पाच वाजेपर्यंत अत्यंत शांततेच्या मार्गाने ही लढाई सुरू करत आहोत. सरकारने हे पुण्याचं काम पदरी घ्यावे. आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे निर्णय घेणे फार महत्त्वाचे आहे.
हीच योग्य वेळ आहे. याच्याशिवाय योग्य वेळ असू शकतच नाही. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करत आहोत की, याशिवाय दुसरी कुठलीही योग्य वेळ नाही. चार-पाच वाजेपर्यंत आम्ही वाट बघत आहोत. चार-पाच वाजेनंतर आम्हाला रामगिरी बंगल्यावर जावं लागेल. प्रशासनाने आम्हाला अटकाव करू नये. आम्ही चार-पाच वाजेनंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. निर्णयाशिवाय आम्ही मागे हटणार नाही. लेखी स्वरूपाचे निर्णय घ्यावेत. काही ठिकाणी शासन निर्णय काढावे लागतील. काही ठिकाणी परिपत्रक काढावे लागतील, ते काढावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.



