नागपूर । नगर सहयाद्री:-
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी उग्र वळण लागले आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी समृद्धी महामार्गावर आक्रमक पवित्रा घेत टायर, लाकूड आणि ज्वलनशील साहित्य जाळत आंदोलन केले. त्यामुळे काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
कार्यकर्त्यांनी सरकार जागे व्हा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले. या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात गद झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्यांच्या संख्येमुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण राहिली.
बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र टीका करत म्हटले की, शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास असे आंदोलन राज्यभर उग्र होईल. प्रशासनाने शांतता राखावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर नागपूरकडे येणारी आणि मुंबईकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फौज तैनात केली असून, आंदोलन सुरूच असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ट्रॅक्टर-बैलगाडा मोर्चा नागपूरवर धडकला असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. वर्धा मार्गावरील पांजरा वळण रस्त्यावर हजारो शेतकरी मागील दोन दिवसांपासून ठिय्या देऊन बसले आहेत. काल रात्री बच्चू कडू स्वतः शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर झोपले, तर बुधवारी सकाळी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.
बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या:
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी. कृषी मालाला हमी भावावर 20% अनुदान देण्यात यावे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे. पेरणी ते कापणीचा सर्व खर्च एमआरईजीएस मधुन करावा. नागपुर – गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा. दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे, मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न माग लावावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी माग लावावा. कांद्याला किमान प्रति किला 40 रुपये भाव द्यावा. गायीच्या दुधाला 50 रुपये तर म्हशीच्या दुधाला 65 रुपये भाव द्यावा.



