अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरमधील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील वाहन निरीक्षक आयेशा हुसैन यांच्याबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. ‘नगर सह्याद्री’ ने 23 फेब्रुवारी रोजी आयेशा हुसेन नगरच्या हप्तेखारीत देखील अव्वल! या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल घेत मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
प्रयागराज व अयोध्येला दर्शनाला जाणाऱ्या हिंदू भाविकांच्या प्रवासी बसला अडवून त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या व हिंदू धर्मगुरूंबद्दल अरेरावीची भाषा वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर वायूवेग पथकात कार्यरत असणाऱ्या संबंधित अधिकारी यांचे खुलासे मागवून सदर प्रकरणाची चौकशी नेमण्यात आली आहे.
आयेशा हुसेन यांच्याबद्दल होणाऱ्या वारंवार तक्रारीबाबत नगर सह्याद्रीने वृत्त प्रकाशित केले होते. मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन यांची प्रशासकीय कारणास्तव फेब्रुवारी 2025 उर्वरित कालावधीसाठी परिवहन संवर्गातील नवीन वाहन नोंदणीसाठी नियुक्त करण्यात आली आहे. नवीन वाहनांची नोंदणी करतांना सहा मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेली वाहने वगळून तीन हजार किलो पेक्षा जास्त वजनाच्या सर्व परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी करणे तसेच जामखेड व खर्डा पोलीस स्टेशन येथील सर्व अपघाताची तपासणी करण्याचा आदेश अहिल्यानगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी काढला आहे.