नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेल्या नगरच्या आरटेीओ कार्यालयातील आयेशा हुसेन यांनी ‘वसुली’ टोळी सुरू केल्याचा आरोप
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
नगरमधील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील वाहन निरीक्षक आयेशा हुसैन यांनी त्यांच्या मजतील खासगी इसमांचा सहभाग असणारी खासगी वसुली टोळी निर्माण केली असून ही टोळी वाहन चालक आणि मालकांना ठरवून त्रास देत असल्याचे समोर आले आहे. आयेशा हुसैन यांच्यावर नागपूरच्या सीताबड पोलिस ठाण्यात पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी आणि त्यातून शासनाची रक्कम कोणताही अधिकार नसताना स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर नागपूरमध्ये सेवेत असताना झालेल्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला असून त्या सध्या नगरच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्याबाबत अत्यंत गंभीर तक्रारी सुरू झाल्या असून त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे करण्यात आली आहे.
आरटीओच्या नगर येथील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक श्रीमती आयेशा हुसैन यांच्यावर नागपूरच्या सीताबड पोलीस ठाण्यात अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालकाकडून पावतीद्वारे घेतलेली 23 हजार रुपयांची रक्कम आपल्या पदाचा गैरवापर करून शासन जमा न करता स्वतःच्या फायद्याकरिता वापरल्याचा ठपका ठेवून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नागपूर येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल नामदेव डाके यांनी नागपूरच्या सीताबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.श्रीमती आयेशा हुसैन या मोटार वाहन निरीक्षक म्हणून 19 सप्टेंबर 2019 से 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत नागपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (नागपूर शहर) याठिकाणी कार्यरत होत्या. श्रीमती आवेशा हुसेन यांनी सदरची शासकीय महसूल रकम भरणा करण्यास झालेल्या विलंबाबत विभिन्न कारणे सादर केली आहेत. परंतु सदरच्या पत्रानुसार सादर केलेली माहिती ही सत्यकथन नसून केलेल्या गैरव्यवहाराला पूर्णविराम देण्याकरीता केलेला व अवास्तव खटाटोप असल्याचे दिसून येते, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन यांनी गैरव्यवहार करण्याच्या हेतूने, आपल्या पदाचा गैरवापर करून सदर शासकीय रोख रक्कम स्वतःच्या वापराकरीता शासन जमा न करता, जवळपास 18 महिने स्वतःच्या फायदयाकरीता वापरल्याचे स्पष्ट दिसून येते. आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय महसुलास हानी पोहोचवून, शासकीय अधिका-यास विश्वस्त म्हणून लागू असणाऱ्या नियमांचे पालन करण्यात कसूर केला आहे. तसेच शासकीय महसुल रक्कम आपल्या पदाचा गैरवापर करून सदरची शासकीय महसूल रक्कम गैरव्यवहार करण्याच्या हेतूने, गैरपध्दतीने स्वतःच्या ताब्यात ठेवली असल्याने जाणीवपुर्वक लोकसेवकास अशोभनीय असे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन केले आहे, असा ठपका ठेवून हा गुन्हा फौजदारीपात्र न्यासभंग या गुन्हे प्रकारात मोडत असल्याने त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीत करण्यात आली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.