अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
कोर्टात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी महिलेवर हल्ला करून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव उपनगरात शनिवारी (22 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली.
जालेश बाबड्या काळे, रूपेश नारायण चव्हाण, आलेश बाबड्या काळे, रोहीत तुकाराम चव्हाण, राहुल छोट्या काळे व नारायण झेड्या चव्हाण (रा. भोसले आखाडा, शास्त्रीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी केडगाव उपनगरात आपल्या कुटुंबासह राहत असून, त्या मजुरी करून उदरनिर्वाह करतात. शनिवारी रात्री 9:30 च्या सुमारास त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून पत्र्यांवर मोठमोठा आवाज करत दहशत माजवण्यात आली.
त्यामुळे त्या बाहेर आल्या असता, समोर जालेश काळे, रूपेश चव्हाण, आलेश काळे, रोहीत चव्हाण, राहुल काळे व नारायण चव्हाण हे हातात लोखंडी रॉड, दांडे व गज घेऊन उभे होते. त्यांनी कोर्टात केलेली केस मागे घे, नाहीतर परिणाम भोगावे लागतील असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावर फिर्यादीने त्यांना याचा जाब विचारला असता, संशयित आरोपींनी त्यांना लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली.
या मारहाणीत त्या जखमी झाल्या आहेत. तसेच, संशयित आरोपींनी त्यांच्या कपड्यांना हिसका देत विनयभंग केला आणि केस मागे घेतली नाही, तर डोळ्यात मिरची टाकून कुर्हाडीने हातपाय तोडू आणि घरातील सर्वांना संपवू अशी धमकी दिली. महिलेने आरडाओरड केला असता त्यांचे पती व शेजारी मदतीला धावले. त्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी फिर्यादीला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार लगड करीत आहेत.