अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना कचऱ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील रस्त्यांच्या कडेला व मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरत असून, पावसाळ्यात आजारांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी मनपा आरोग्य विभागावर जोरदार टीका करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
माजी नगरसेवक घुले यांनी सांगितले की, आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. मनपा सर्व विभागात अव्वल असल्याचा दावा करते, पण प्रभागातील कचऱ्याचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही. प्रत्येक वेळी फोन करून कचरा उचलण्यासाठी विनंती करावी लागते, मात्र आरोग्य विभागाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळतात.
परिसरातील काही भागात 10 ते 15 दिवसांपासून घंटागाडी आलेली नाही. काही वेळा गाडी आली तरी तिच्यासोबत केवळ ड्रायव्हर असतो, मदतनीस नसतो. गाडीची उंची जास्त असल्याने महिलांना कचरा टाकताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मनपा कररूपाने पैसा गोळा करते, पण नागरिकांना मूलभूत सुविधा कधी देणार? असा प्रश्न घुले यांनी उपस्थित केला.
मनपाने अजूनही कचरा संकलनासाठी टेंडर प्रक्रियेची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे घंटागाडी वेळेवर व नियमित येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. येत्या तीन दिवसांत जर प्रभागात घंटागाडी रोजच्या रोज आली नाही, तर नागरिकांना घेऊन मनपा आवारातच कचरा टाकून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी दिला.