अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
धारदार शस्त्राने तरूणाच्या छातीत वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. विश्वास पोपट सोनवणे (रा. राज हॉटेलच्या पाठीमागे, अबोली कॉलनी, नवनागापूर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर सुरूवातीला नगर मधील रूग्णालयात उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी पुणे येथील रूग्णालयात दाखल केले आहे.
एमआयडीसीतील सह्याद्री चौकात 18 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी जखमी विश्वास यांची आई संगीता पोपट सोनवणे (वय 50 रा. राज हॉटेलच्या पाठीमागे, अबोली कॉलनी, नवनागापूर) यांनी गुरूवारी (30 जानेवारी) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखन नानासाहेब कर्जुले (रा. तामसवाडी, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित लखन कर्जुले याने कोणत्यातरी धारदार शस्त्राने विश्वास सोनवणे यांच्या छातीत वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हल्ल्यात विश्वास सोनवणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून संशयित लखन कर्जुले याचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.