श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर (ता. श्रीगोंदा) येथील दलित समाजातील विद्यमान महिला सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा श्रीगोंदा शहरात तीव्र निषेध करण्यात आला असून, गुन्हेगारांना दोन दिवसात अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशार विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.
याबाबत पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे व पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन दिले आहे. यावेळी आर.पी.आयचे नेते जिवाजीराव घोडके, राष्ट्रवादी समाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष संदीप उमाप, कुणाल शिरवाळे (अजित पवार गट), मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष नंदकुमार ससाने, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, शिवाजी घोडके, संदीप भोईटे (शिंदे गट), अजित भोसले, राजू ससाने, अॅड. प्रेरणा धेंडे, रतन पवार आदी उपस्थित होते.
रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी सरपंच मीनाक्षी सकट या तालुक्यातून आपल्या घरी परतत असताना, काही गावगुंडांनी त्यांच्यावर व त्यांच्या लहान मुलावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली, मीनाक्षी सकट गंभीर जखमी झाल्या, तर त्यांच्या मुलाला मारहाण करून दुखापत करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.