अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कल्याण रस्त्यावरील माधवनगर येथे घरासमोरील काट्याचे कुंपण काढण्याच्या वादातून एका महिलेवर आणि तिच्या पतीवर हल्ला करण्यात आला. सदर घटना रविवारी (23 मार्च) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
छाया सदानंद खंडागळे (वय 45, रा. माधवनगर, नगर-कल्याण रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सुनंदाबाई कैलास डाडर, तेजश्री संतोष नवगिरे, संतोष नवगिरे (पूर्ण नाव माहिती नाही), शुभम कैलास डाडर (सर्व रा. माधवनगर, नगर- कल्याण रस्ता, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीच्या घरासमोरील काट्याचे कुंपण काढण्यास सुरूवात केल्यामुळे वाद झाला.
त्यांनी हे कुंपण हटवू नये असे सांगितल्याने संशयित आरोपी सुनंदाबाई डाडर हिने त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर तेजश्री नवगिरे व संतोष नवगिरे यांनीही त्यांना मारहाण केली. फिर्यादीचे पती सदानंद खंडागळे भांडण सोडवण्यास आले असता, शुभम डाडर याने त्यांना शिवीगाळ केली व हातातील लाकडी काठीने त्यांच्या चेहऱ्यावर मारहाण केली. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.