अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मजले चिंचोली (ता. नगर) शिवारात विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेवर कुर्हाड आणि लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला. वनिता अनिकेत खेडकर (वय 22 रा. मजले चिंचोली, ता. नगर) असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र रोहिदास गिते, रोहिदास गजाबा गिते (दोघे रा. मजले चिंचोली, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वनिता यांच्या शेतालगत जितेंद्र गिते आणि रोहिदास गिते यांची शेती आहे. त्यांच्या शेतीत असलेल्या सामाईक विहिरीच्या पाणीवाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होता.
रविवारी (9 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. वादावादी सुरू असताना संशयित आरोपींनी कुर्हाड आणि लोखंडी पाईपने वनिता यांच्यावर हल्ला चढवला. तसेच शिवीगाळ करत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या हल्ल्यात वनिता जखमी झाल्या असून त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत.