अहिल्यानगर । नगर सहयाद्री
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक नेता सुभाष चौक येथे आली असता काही एक कारण नसतांना गुरुदत्त युवा प्रतिष्ठान सर्जेपुरा मंडळाचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांना जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी योगेश बाबासाहेब सोनवणे (वय 31 वर्ष, रा. विक्रम मोटर्स शेजारी, सर्जेपुरा, रंगभवन, ता.जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत असताना मात्र अहिल्यानगर शहरात जयंती मिरवणुकीत गालबोट लागल्याचा प्रकार घडला. जयंतीनिमित्त गुरुदत्त युवा प्रतिष्ठान सर्जेपुरा मंडळाचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी सर्जेपुरा ते माळीवाडा बसस्थानक अशी डीजे सिस्टीमची मिरवणूक काढली.
रात्री साडेनऊच्या सुमारास मिरवणूक नेता सुभाष चौक येथे आली असता काही एक कारण नसतांना युवा सेनेचे विक्रम अनिल राठोड (रा. नेता सुभाष चौक, अहिल्यानगर) मिरवणुकीच्या ठिकाणी येवून जातीवाचक शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन निघून गेला. याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून विक्रम राठोड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती (ॲट्रॉसिटी) अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती करत आहेत.
माझ्यावर खोटा गुन्हा; विक्रम राठोड
दरवषप्रमाणे आम्ही प्रत्येक मिरवणुकीचे नेता सुभाष चौक येथे स्वागत करत असतो. याही मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी उभे होतो. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक नेता सुभाष चौकात आली असता एका राजकीय पुढाऱ्याचे गाणे लावण्यात आले. तसेच संबंधित मिरवणुकीत काही टोळक्याने वेगळ्या प्रकार हावभाव केले. याबाबत आम्ही पोलिसांना यापूवच सांगितले होते. अण्णा भाऊ साठे यांच्याबाबत गाणे लावण्याची विनंती केली. पोलिसांनी डीजे बंद केला आणि पुढे घेतला. ऐवढाच प्रकार घडला आहे. परंतु, राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरुन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे विक्रम राठोड यांनी सांगितले.