spot_img
महाराष्ट्रउगवतीला नमस्कार करण्यास सज्ज झालो असताना नव्या वळणावर!

उगवतीला नमस्कार करण्यास सज्ज झालो असताना नव्या वळणावर!

spot_img

विशेष संपादकीय / शिवाजी शिर्के

सरत्या वर्षाला निरोप देताना उगवतीला नमस्कार करताना म्हणजेच नव्या वर्षाचे स्वागत करताना मी अंतर्मुख झालोय. गेली वर्षभर मी पळत होतो म्हणजे नक्की काय? समोर काही लक्ष्य होते म्हणून पळत होतो की पळणे दिशाहीन होते? कोणी इकडे जा म्हटले तर इकडे, कोणी त्या दिशेला वळून धाव म्हटले की तसे; असे नाही ना झाले आपले? की एका ठिकाणीच गोल गोल फिरत राहिलो? वाटेतले अडथळे म्हणजे नक्की काय होते? कामाच्या ठिकाणी, घरी, राहत्या परिसरात, समाजातल्या परिस्थितीतील वेगवेगळ्या गोष्टींमुळे निर्माण झालेल्या अडचणी, संकटे की मनाने निर्माण केलेले अडसर? मनातल्या शंकाकुशंका, संशय, अविश्वास, मत्सर, राग, लोभ, कमीपणाची भावना असे वेगवेगळे विचार आणि भावना? आपण शर्यत जिंकलो की नाही असा विचार आला का माझ्या मनात? कसली शर्यत जिंकायची आहे? करिअरमध्ये? आपल्या महत्त्वाकांक्षांची? लोकांशी आपण करत असलेल्या तुलनेची शर्यत? की आपणच आपल्यासमोर ठेवलेल्या चढत्या उद्दिष्टांची? आपण आपल्यासमोर ठेवलेल्या आव्हानांची? आपल्यातील काही कमतरता, स्वभावदोष, जीवनशैलीतील दोष दूर करण्याची?
साधारणपणे डिसेंबर महिना सुरू झाला अन् त्यातही डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला की ३०-३१ डिसेंबरच्या सुमाराला सगळे जण भावनिक होतात. संपत आलेल्या वर्षाचा मनातल्या मनात लेखाजोखा घेतला जातो आणि त्याला काही तरी लेबल दिले जाते, विशेषण लावले जाते. ‘हे वर्ष फारच वेगाने गेले, आयुष्याचा स्पीड फारच वाढत चालला आहे बुवा!’ ‘या वर्षी ना फार वाईट बातम्या कानावर आल्या, एकूण वाईटच जास्त घडले’. ‘प्रत्येक जाणार्‍या वर्षामध्ये आपल्या जगातले प्रश्न वाढतच चालले आहेत असे लक्षात येते आणि मन अगदी खिन्न होते’!
मागचे वर्ष अनेक बदलांचे होते! शहर, घर, मुलांच्या शाळा, ऑफिसमधले मित्र!’ प्रत्येकाचे आपले आपले पर्सेप्शन असते, दृष्टिकोन असतो. आपल्या अनुभवांच्या आधारावर प्रत्येकाला मनात जाणवलेले असे ते असते. त्या त्या वर्षी प्रामुख्याने आलेले अनुभव, मनात ठसलेले प्रसंग, आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांचा मनात निर्माण झालेला अर्थ, त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन या सगळ्यातून आपल्या मनात त्या वर्षासंबंधी एक प्रतिमा तयार होते आणि आपण सरत्या वर्षाचे वेगवेगळ्या शब्दांत वर्णन करतो.

माझ्या मनातही मागच्या वर्षाची एक प्रतिमा तयार होती. चक्क पायात बूट घालून पळणारा एक धावपट्टू डोळ्यासमोर उभा ठाकला! वाटले असे गेले आपले वर्ष! धावत पळत! मग वाटेतले अडथळे आणि पूर्ण केलेल्या शर्यतीही डोळ्यासमोर उभ्या राहिल्या! वाटले, बाप रे! असे गेले का आपले वर्ष? म्हणजे नक्की काय झाले आपल्या आयुष्यात? आणि वर्ष संपता संपता शर्यत जिंकताना सीमारेषेवर लावलेली दोरी तोडून धावपटू सीमारेषा ओलांडतो तसे काही झाले का? की यंदाही मी असाच बूट घालून पळत राहणार आहे? गेली वर्षभर खरंच ‘शर्यत’ होती का ती? आपली आपल्याशी किंवा कोणा दुसर्‍याबरोबर, आपण जे मागच्या वर्षांत आपले जीवन जगलो ती काय शर्यत होती का? शर्यत म्हटले की त्यात स्पर्धा आली, यश अपयश आले, जिंकणे हरणे आले आणि त्याच्या बरोबर निर्माण होणारी अस्वस्थता, बेचैनी, दडपण, टेन्शन आणि दुःख, राग  असं जे काही असेल ते- ते!

क्षणभर मी डोळे मिटले आणि डोळ्यासमोर खरोखरच एक बूट घालून धावणारा धावपट्टू डोळ्यासमोर आला! तो शांतपणे धावत होता, पळत नव्हता बरं का! आजूबाजूला बघत होता. परिसरातील झाडे झुडुपे, फुले पक्षी, लांबवर दिसणारे आकाश सगळे डोळ्यात साठवून घेत होता. येणार्‍या जाणार्‍या वृद्ध जोडप्याकडे सहज कटाक्ष टाकत होता, लहानग्या मुलाकडे बघून हात हलवून हसत होता! अनेकदा तो एकटा नव्हता! कधी बरोबर बायको, कधी मुलगा- मुलगी, कधी मित्र साथीला होते. धावून झाल्यावर कटिंग चहा पिताना शाळेच्या वर्गाच्या सहलीची तो चर्चा करत होता, वस्तीमध्ये मुलांची तपासणी करायला जाणार्‍या गटाशी बोलत होता, कधी तरी एकटाच आपल्या कामाचा विचार करत होता.

धावता धावता वेग कमी करून चालूया असे ही काही वेळा त्याने केलेले जाणवले. आपले कटुंब, विस्तृत परिवार, मित्र मंडळी, सहकारी यांचा विचार मनात करता करताच आपला समाज, समाजातील घडामोडी, आपल्या आजूबाजूच्या अनेक चांगल्या घटना, माणसे इत्यादींचा विचार करत तो चालत आहे असे डोळ्यासमोर असताना मी डोळे हळूच उघडले. मनाची पाटी कोरी झाली होती. नवीन वर्षाची नवी अक्षरे त्यावर लिहिण्यासाठी मीही सज्ज झालो होतो. चला… नव्या वर्षात पदार्पण करताना नवी आशादायी सुरूवात करु या! नगर सह्याद्री आणि न्यूज २४ सह्याद्री परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष...

‘लाडकी बहीण’वरून लाडक्या बहिणी भिडल्या; कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत...

लाच स्वीकारताना तलाठी अडकला जाळ्यात; नगरमध्ये कुठे घडला प्रकार पहा…

कोपरगाव | नगर सह्याद्री सदनिकेच्या खरेदीखताची नोंद सातबारा उतार्‍यावर करून देण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच...

चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; काय घडलं पहा

चार इंस्टाग्रामधारकांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे (चाईल्ड पोर्नोग्राफी) व्हिडीओ सोशल...