विधानसभा मतदानासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज | कडेकोट बंदोबस्त तैनात
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी थंडावला. मंगळवारी शांततेत प्रचार सुरु होता. मतदारांना खूश करण्यासाठी उमेदवारांनी विविध पद्धतीने यंत्रणा राबविली. परंतु असे असले तरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची बुधवारी परीक्षा होत असून त्यांचा निकाल शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यवस्थित नियोजन केले आहे. तसेच 21 हजार 574 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 37 लाख 83 हजार 987 मतदार असून मतदान प्रक्रिया 3 हजार 765 मतदान केंद्रावर राबवली जाणार आहे. 17 हजार 169 जणांनी पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे.
राहिलेल्या मतदारांसाठी बुधवारी मतदान होत आहे. मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी मतदान यंत्र, साहित्य मंगळवारी देण्यात आले असून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या. कर्मचाऱ्यांसाठी 1774 वाहनांची सोय करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अहिल्यानगर शहरासह जिल्हाभर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी सुमारे चार हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच तीन हजार 600 होमगार्ड तैनात राहणार आहेत. जिल्ह्यात तीन हजार 765 बुथवर मतदान होणार आहे. त्यापैकी सतीची वाडी (संगमनेर) व तरकसवाडी (शिड) हे दोन मतदान केंद्र क्रिटीकल आहेत. सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.