अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
लोखंडी कोयता आणि धारदार हत्याराने हल्ला करून युवकाला जखमी केल्याची घटना भिंगार उपनगरातील महेशनगर, शौर्य हॉटेल जवळ रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. मयुर जालोदर कानडे (वय 23 रा. मेहकरी, ता. नगर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण पाखरे, रोहित गवळी, प्रताप भिंगारदिवे (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मयुर हे रविवारी सायंकाळी शौर्य हॉटेल जवळ असताना संशयित आरोपी त्यांच्या जवळ आले. अक्षय हंपे याच्या सोबत राहतो या कारणा वरून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी कोयत्याने तसेच धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केले.
मयुरच्या मालकीच्या दुचाकी (एमएच 16 सीडी 0902) चेही नुकसान करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी मयुर यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार व्ही. एन. राठोड अधिक तपास करत आहेत.