Maharashtra Crime News:पूर्ववैमनस्यातून काल सायंकाळी सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याची भयंकर घटना घडली आहे. एका तरुणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. ओंकार उर्फ रोहित संजय फाळके (वय 24) असे मयत युवकाचे नाव आहे. तर संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर अस्लम शिकलगार, आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे जखमी झाले आहे.
गुरुवारी संध्याकाळी दहा ते बारा जणांच्या टोळक्यानी ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर हल्ला चढवला. त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्याच्या मामांची दोन मुलेही होती. या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बसस्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला.
दरम्यान,आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले. यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला. याचवेळी रोहितचे वडील संजय, आई जयश्री यामध्ये आल्या. त्यांनाही या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण केली. सर्वचजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकलवरुन धूम ठोकली.
सदरची घटना तासगाव तालुक्यातील वायफळे गावातील बस स्थानक चौक व दलित वस्ती परिसरात घडली आहे. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हल्ल्यातील मुख्य आरोपी हा बरेच वर्षांपासून पुणे येथे राहायला असून रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्यांच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून ती आरोपीच्या मागावर आहेत.