अहमदनगर। नगर सहयाद्री-
पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दरोडाप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपी जेरबंद केले आहेत. या घटनेत १३ आरोपींचा समावेश असून ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील तुकाराम पवार, (रा. पायडर्डी) हा चोरी करण्यापूर्वी अन्य आरोपींना बोलावून घेत कोठे चोरी करायची ते ठिकाण ठिकाण दाखवायचा. त्यानंतर रात्रीचे वेळी त्याचे अन्य साथीदार चोरी करायचे.
तसेच चोरीकेलेले सोने पवार याचेकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तसेच आरोपींकडून ८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आजिनाथ गणेश रामनाथ पवार (वय २५, रा. ब्रम्हगव्हाण, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर), बिनोद बड़े (वय २७, रा. बारणी, जिल्हा बीड), अविनाश मेहेत्रे (वय २८, रा. कुळधरण रोड, कर्जत), अमोल मंजुळे (वय २३, रा. कर्जत), असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे.
सविस्तर वृत्त: तुकाराम पवार, हा आम्हाला चोरी करण्यासाठी आगोदर बोलावून घेत ज्याठिकाणी चोरी करायची ते ठिकाण दाखवत व त्यानंतर आम्ही रात्रीचे वेळी जावून चोरी करत व चोरी केलेले सोने तुकाराम पवार याचेकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देतो, असे सांगितले. आरोपी तुकाराम पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, चोरी व इतर कलमान्बये ९ गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी
बाबासाहेब ढाकणे (वय ७४, रा. अंबिका नगर, टाकळी मानूर) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यांच्या तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हातील आरोपी संदीप बड़े साथीदारासह पाथर्डीतून मोहटादेवी रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तीन पथके तयार करून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.