पुणे / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण विविध रंग घेत आहे. त्यात राधोतरावाडीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या हातून पक्ष व चिन्ह दोन्ही गेले. परंतु कितीही विरोधी परिस्थिती असली तर त्यातून मार्ग काढून आपला दबदबा कायम ठेवतात अशी शरद पवार यांची देशात ओळख आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबाबत सर्वत्र चर्चा होतेय. असं असतानाच शरद पवार त्यांची जुनी खेळी खेळताना दिसत आहेत.
लोकांशी संपर्क करणं, भेटीगाठी घेणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं ही शरद पवार यांची जुनी राजकीय निती आहे. लोकांचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. असं शरद पवार म्हणतात. आता पक्ष हातून गेल्यानंतर हीच रणनिती शरद पवार पुन्हा एकदा आखताना दिसत आहेत. पक्ष हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा बारामतीत आहेत. अशात ते जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.
शरद पवार आता राष्ट्रवादीपासून दूर गेलेल्या नेत्यांना भेटत आहेत. इंदापूरच्या पिता-पुत्रांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी गोविंदबाग येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पृथ्वीराज जाचक यांचे चिरंजीव कुणाल जाचक उपस्थित होते. या दौऱ्यामुळे इंदापूर तालुक्यात नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केले आहे.
पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत. कालपासून गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. सकाळपासून पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत आहेत.