spot_img
ब्रेकिंग'आरोपींना अटक करा नाही तर आम्हाला गोळ्या घाला'

‘आरोपींना अटक करा नाही तर आम्हाला गोळ्या घाला’

spot_img

बीड / नगर सह्याद्री
मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन पुकारलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महिला आणि पुरुष नदीत उतरले होते. तर हे दृश्य पाहण्यासाठी अख्खं गाव नदी किनारी जमा झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावकऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. एक तर तुम्ही तिन्ही आरोपींना अटक करा. त्यांना कधी अटक करणार याची तारीख सांगा. नाही तर आम्हाला गोळ्या तरी घाला, अशी संतप्त भावना या गावकऱ्यांनी व्यक्त केली.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनना अटक करण्यासाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं. महिला आणि पुरुष नदीत कमरेएवढ्या पाण्यात उतरले होते. हे सामूहिक जलसमाधी आंदोलन पाहण्यासाठी मस्साजोगसह इतर गावातील गावकरी नदी किनारी आले होते. यावेळी एक महिला आणि तरुणाची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना स्ट्रेचरवरून नदीतून बाहेर आणण्यात आलं. यावेळी पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनीही आक्रमकपणे आपलं म्हणणं मांडलं.

आरोपींना अटक का होत नाही? आमचं गाव दहशतीखाली आहे. आमच्या गावात एक पोलीस चौकी द्या. वाल्मिक कराडला अटक होणार असल्याची माहिती त्याच्या समर्थकांना कशी कळली? त्याच्या समर्थनासाठी परळीतून त्याच दिवशी 100 गाड्या पुण्याला जातात. एवढी माहिती त्या लोकांना आहे. आरोपीचा व्हिडीओ येतो. जनरल लोकांना ज्या गोष्टी माहीत आहे, त्या पोलीस प्रशासनाला माहीत नाही. मग बाकीचे आरोपी माहीत नाही हे कशावरून समजायचं?, असा सवाल गावकऱ्यांनी कॉवत यांना केला.

मग खुशाल गोळया घाला
आरोपींना कधी अटक होणार याची तारीख सांगा. तुम्ही जी तारीख सांगाल तोपर्यंत आम्ही तुम्हाला एका शब्दानेही बोलणार नाही. त्यानंतर तुम्ही तुमचे गनवाले लोकं आणा आणि आम्हाला गोळ्या घाला, असं सांगतानाच आम्ही तुम्ही आलात म्हणून आम्ही पाण्याबाहेर बाहेर आलो. बाया आम्हाला शिव्या देत आहेत, असं गावकरी म्हणाले.

कराडवर खुनाचा गुन्हा का नाही?
संतोष देशमुखने काही कराडच्या घरी चोरी केली नव्हती, की त्यांच्या घरातील ज्वारीचे पोते उचलून आणले नव्हते. हे भांडण खंडणीवरून झालं. वाल्मिक कराडच्या आदेशावरून खंडणी मागायला आरोपी आले होते. त्यानंतर तीन दिवसाने देशमुख यांचा खून झाला. मग वाल्मिक कराडला फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच अटक का केली? भांडण कशामुळे झालं हे सत्य आहे ना? भांडण काही घरगुती नव्हतं ना? खंडणीचा आदेश देणाऱ्यावर खूनाचा गुन्हा का नाही? असा सवाल करतानाच वाल्मिक कराडला कठोर शिक्षा द्या. तो खंडणीच्या गुन्ह्यातून बाहेर आला तर आमची वाट लावेल, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली.

पोलिसांनाही सहआरोपी करा
आरोपीने प्रेत टाकल्या टाकल्या पोलीस 10 मिनिटात घटनास्थळी येतात. मग महाजन साहेबांना आरोपी कुठे हे माहीत नाही का? या प्रकरणात पोलिसांनाही सहआरोपी करा. आरोपी पकडले गेले नाही तर आम्ही लेकराबाळासह रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलन मागे
दरम्यान, नवनीत कॉवत यांनी या गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. लवकर तपास व्हावा म्हणून डीआयजीच्या नेतृत्वात एसआयटी नेमली आहे. धनंजय देशमुख माझ्या ऑफिसला आले होते. त्यांना तपासाची सर्व माहिती दिली आहे. आता हा तपास सीआयडीकडे आहे. पण आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी दोन्ही टीम काम करत आहे. तिन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी बाहेर या. तुमचं आंदोलन मागे घ्या. आम्हाला सहकार्य करा, असं आवाहन नवनीत कॉवत यांनी दिलं. त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष...

‘लाडकी बहीण’वरून लाडक्या बहिणी भिडल्या; कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत...

लाच स्वीकारताना तलाठी अडकला जाळ्यात; नगरमध्ये कुठे घडला प्रकार पहा…

कोपरगाव | नगर सह्याद्री सदनिकेच्या खरेदीखताची नोंद सातबारा उतार्‍यावर करून देण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच...

चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; काय घडलं पहा

चार इंस्टाग्रामधारकांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे (चाईल्ड पोर्नोग्राफी) व्हिडीओ सोशल...