अहमदनगर : नगर सह्याद्री
अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. यशवंत डांगे हे पुणे येथील पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सहय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. दरम्यान या अगोदर अमरावती विभागीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेले अतिरिक्त आयुक्त देविदास पवार यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय पातळीवर राजकीय हालचाली झाल्या. त्यानंतर राजकीय घडामोडी घडत यशवंत डांगे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे यांच्यावर एसीबीने कारवाई केली आहे. त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार आहेत त्यांच्या आयुक्त पदाचा पदभार हा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे देण्यात आला होता. काही दिवसानंतर नगर विकास विभागाने अमरावती येथे कार्यरत असलेले देविदास पवारांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. तसे आदेशही नगर विकास विभागाने काढले होते.
मात्र राजकीय हालचाली होत त्यांच्या जागी नगर येथे उपायुक्त म्हणून काही कार्यकाल पूर्ण केलेले यशवंत डांगे यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे समजते.