अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 289 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दाखल अर्जांची काल, बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. त्यातील फक्त 30 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असून 259 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहे. पात्र उमेदवारांची यादी त्या त्या मतदारसंघात प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान, बहुतेक अर्ज वैध असल्याने आता अर्ज माघारीकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. सोमवार, 4 नोव्हेंबर ही अर्ज माघारीची अखेरची तारीख आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काल, बुधवारी अर्ज छाननीत बाद झालेल्या अर्जांमध्ये डमी अर्जांचाच अधिक समावेश आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रमुख उमेदवारांचा समावेश नाही. आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज बाद झाले आहेत. बहुतेक अर्ज वैध असल्याने आता अर्ज माघारीकडे मतदारांचे लक्ष लागले. काही अर्जांबाबत हरकती आल्याने त्यावर सुनावणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उमेदवार व हरकत घेतलेल्या व्यक्तींची बाजू वकिलांमार्फत संबंधीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी ऐकुण घेतली व त्यानंतर अर्ज वैध, अवैध याबाबत निर्णय दिला.
दरम्यान, उमेदवारांमध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे, हेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अशा उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रमुख उमेदवारांची दमछाक होणार आहे. अर्ज बाद होऊ नये, म्हणून बहुतेक उमेदवारांनी स्वतंत्रपणे वकिलाची नियुक्ती केली होती. अर्जातील त्रृटींबाबत अधिकार्यांनाही विश्वासात घेऊन अर्ज भरले जातात. त्यामुळे अर्जात सहसा चुका दिसून आल्या नाहीत. काही अपवाद वगळता अर्ज बाद होण्यामध्ये ‘टेक्निकल’ बाब असल्याचे दिसून येते. बहुतेक उमेदवार डमी अर्जही भरतात. ते अर्ज बाद केले जातात.
प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना विशेष काळजी घेतली असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक अर्जासोबत पक्षाचा एबी फार्म न जोडता पक्षाच्या नावाने जोडलेले अर्ज बाद करण्यात आले. जिल्ह्यात अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणार्यांना उमेदवार न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून भरलेले आहेत. ते शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की ऐनवेळी माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोले 13 (1), संगमनेर 16 (1), शिर्डी 15 (3), कोपरगाव 20 (1), श्रीरामपूर 31 (3), नेवासा 24 (0), शेवगाव 36 (9), राहुरी 27 (3), पारनेर 21 (1), अहमदनगर शहर 27 (3), श्रीगोंदा 36 (5), कर्जत-जामखेड 23 (0), एकूण अर्ज 289 (30) आहे.