मुंबई। नगर सहयाद्री-
जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात सध्या थंडीची लाटपाहायला मिळत असून पुढील काही दिवसात हवामानात बदल होताना पाहायला मिळत असल्यामुळे राज्यात पुन्हा ‘अवकाळी’ संकट निर्माण होणार असून पुढील २४ तासांत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभगाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यांचा विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे.
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग वाढणार असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.