तर कॉन्व्हेन्ट शाळेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हनुमान चालीसा पाठ करणार – सुमित वर्मा
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील कॉन्व्हेन्ट आणि इतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा मनमानी कारभार सुरु असलेल्या गैरप्रकारा बाबत अनेकदा मनवीसेने शिक्षण विभागा कडे तक्रारी केल्या आहेत. या शाळांमध्ये हिंदू धर्म विरोधी कारवाया सुरु आहेत. तसेच पालकांची सर्रास आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्यावर शिक्षण विभाग थातूरमातूर एखादं पत्र काढून शांत बसतं आणि या सर्व शाळांचा मनमानी कारभार सुरूच राहतो. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक होऊन महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या कार्यालयात घेराव घालून जाब विचारला. शहरातील कॉन्व्हेन्ट आणि इतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील हा गैरकारभार थांबला नाहीतर कॉन्व्हेन्ट शाळेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हनुमान चालीसा पाठ करेल असा इशारा सुमित वर्मा यांनी यावेळी दिला.
राज्य शासनाच्या आदेशाचे पालन जर शिक्षण विभागाला करता येत नसेल तर आम्ही समर्थ आहोत. आम्ही त्या धर्मांध शाळांचा मनमानी कारभारास विरोध करणार आहोत. या शाळांमध्ये गंध लाऊ न देणे, पैंजण घालू न देणे, हिंदू सणावाराला मेहेंदी काढून न देणे या सर्व फतव्यांना विरोध करणार आहोत. तसेच या शाळांमधून विशिष्ट धर्माच्या प्रार्थना जर थांबल्या नाहीत तर आम्ही या शाळांमध्ये जाऊन हनुमान चालीसा पाठ करू. असे ठणकावून सांगितले.
त्यावर शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी तात्काळ शहरातील २० इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सर्वे करण्याचे लेखी आश्वासन दिले आणि दोषी शाळांवर मान्यता रद्द करण्याची कार्यवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात मनवीसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, युवती जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे, शहराध्यक्ष अनिकेत शियाळ आदी सहभागी झाले होते.