अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राज्यात मागील काही महिन्यांपासून विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्या उफाळून आल्या असून, याच पार्श्वभूमीवर शेवगाव तालुक्यातील कोणोशी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अमोल दौंड (वय 22), या वंजारी समाजातील तरुणाने आरक्षणाच्या प्रश्नामुळे नैराश्यात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अमोलच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतून त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. आपल्या जातीचं काहीच होऊ शकत नाही, म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, असा उल्लेख अमोलने चिठ्ठीत लिहिला होता. त्यामुळे त्याने समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नैराश्येत जाऊन हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, वंजारी आणि बंजारा समाजांकडूनही त्याच गॅझेटियरच्या आधारे आरक्षणाची मागणी सुरू झाली आहे. वंजारी समाजाला एस. टी. प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनही सुरू आहे. स्थानिक वंजारी समाजातील नेत्यांनी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.