जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड शहराच्या लगत असणाऱ्या रेणुका कलाकेंद्रावर अक्षय मोरे उर्फ चिंग्या याच्या टोळीने आठवड्यात दुसऱ्यांदा राडा घातला. तीन दिवसांपूव चिंग्या आणि त्याच्या टोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असताना त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी खंडणीचा गुन्हा दाखल असतानाही त्याच्यासह त्याच्या समवेतच्या पंधरा- वीस जणांच्या टोळक्याने कलाकेंद्रावर येऊन जवळपास सात-आठ गाड्यांची तोडफोड केली. याशिवाय कलाकेंद्रातील महिलांना बेदम मारहाण देखील केली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मोहा (ता. जामखेड) येथील रेणुका कलाकेंद्रावर चार जणांच्या टोळक्यांनी हातात कोयता घेऊन दहशत करुन थिएटरचे मालक अनिल पवार व त्याचे मुले परसू पवार, मोहित पवार, यांना आम्हाला दर महिन्याला एक लाख रुपये आणून द्यायला सांगा नाही तर आम्ही थिएटर चालू देणार नाही. तसेच त्यांनी त्यांचे हातातील कोयत्याने थिएटर मधील खुर्च्या टेबल व दोन मोटार सायकल व स्कुटीची तोडफोड केली. तसेच नृत्यकाम करणारे मुलींची छेडछाड केली व मुलींशी अलील वर्तन केले आहे यावरून चार जणांवर खंडणी, विनयभंग व आर्म अँक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा राग डोक्यात ठेवून चिंग्या आणि त्याच्या टोळक्याने रात्री उशिरा पुन्हा या कलाकेंद्रावर येत वाहनांची तोडफोड केली आणि महिलांसह उपस्थितांना मारहाण केली. दरम्यान, चिंग्याच्या बंदोबस्त का झाला नाही असा सवाल आता जामखेडमधून उपस्थित केला जात आहे.
जामखेड तालुक्यातील मोहा येथे असलेल्या रेणुका कलाकेंद्रात दि. 10 रोजी रात्रीच्या साडेबाराच्या सुमारास अज्ञात जमावाने तोंडाला रूमाल बाधून व हातात तलवार घेऊन रिक्षा, दुचाकी वाहने यांची मोडतोड केली. कलाकेंद्रात प्रवेश करून तेथील नृत्यकाम करणाऱ्या महिलांना व एक पुरुषांना मारहाण केली.
तसेच कलाकेंद्रातील वाद्य व खुर्च्याची तसेच सीसीटीव्हीची तोडफोड केली. वीस मिनिटे असा प्रकार चालू होता. यानंतर सर्व जमाव येथून निघून गेला. या अज्ञात जमावाच्या हल्ल्यात दोन महिला व एक पुरूष जखमी झाले. सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. तोपर्यंत सर्व अज्ञात जमाव बीडच्या दिशेने निघून गेले
पीआय चौधरींचा निष्क्रीय कारभार!
जामखेड शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगार मोकाट सुटण्यात जामखेडचे पोलीस दशरथ चौधरी यांचा निष्क्रीय कारभार कारणीभूत ठरला आहे. चौधरी यांच्याबाबत अनेक गंभीर तक्रारी आहेत. गुन्हेगारांशी त्यांची असणारी लगट आणि त्यातून गुन्हेगारांना मिळालेले मोकळे रान हेच या गुन्हेगारीला कारणीभूत ठरले असल्याने चौधरी यांची तातडीने अन्यत्र बदली करावी अशी मागणी होत आहे.