पुणे / नगर सह्याद्री –
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलनासाठी ओळखले जातात. अशातच पुण्यात अण्णा हजारे यांचा फोटो असलेला एक बॅनर लावण्यात आला आहे. यावर ‘आता तरी उठा अण्णा, मतांची चोरी झाली आहे,’ असा मजकूल लिहिलेला आहे. अण्णांना याद्वारे आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या बॅनरवरून अण्णा हजारे भडकले आहेत. वयाच्या 90व्या वर्षीही काम करावं का? असा प्रतिप्रश्न अण्णांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
माझ्या प्रयत्नांमुळे 10 कायदे अस्तित्वात आले
पुण्यातील या बॅनरबाबत अण्णा हजारे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अण्णा म्हणाले की, ‘आतापर्यंत मी भरपूर काम केले आहे. भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आंदोलने केली आहेत. माझ्यामुळे या देशात दहा कायदे झाले. माहितीच्या अधिकाराचा कायदा माझ्यामुळे मिळाला. देशात मोठ्या प्रमाणात जागृती झाली. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त असे कायदे माझ्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आले आहेत.’
पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, ‘आता माझं वय झालं आहे. मी 90 वर्षांचा झाल्यानंतरही काम करायचे आणि तुम्ही झोपून राहायचे? अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर ते चूकीचे आहे. माझ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा मागच्या काळात मी जे केले ते आजच्या तरुणांनी करावे असं विधान अण्णा यांनी बॅनर लावणाऱ्यांना केलं आहे.
तरुणांनी आता जागं व्हायला हवं – अण्णा हजारे
तरुणांना सल्ला देताना अण्णा म्हणाले की, ‘आजपर्यंत मी जे केलं, ते आता तरुणांनी करावं. त्यांचं या देशाप्रती कर्तव्य आहे. कारण तेही या देशाचे नागरिक आहेत. फक्त बोट दाखवून ‘हे करा, ते करा’ म्हणणं चुकीचं आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. तरुणांनी आता जागं व्हायला हवं’ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांनी दिल्लीत 2012 साली लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केलं होतं. मात्र त्यानंतर ते आंदोलनांपासून दूर आहेत.