पारनेर / नगर सह्याद्री –
समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या ९० व्या वर्षी पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. अण्णा हजारे यांनी आरोप होणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी अण्णा हजार यांनी कोणाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख आरोप होणाऱ्या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे कृषीमंत्री असलेले शशिकांत सुतार, सिंचन खात्याचे मंत्री असलेले महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शोभा फडणवीस यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एक ना अनेक आरोप होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारे यांनी नाव न घेता माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेवर एक प्रकारे प्रहार केल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले अण्णा हजारे
माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी म्हटले की, मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी सर्वात प्रथम राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली होते. कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते. आरोप असणाऱ्या लोकांना मंत्रीमंडळात घेण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. मंत्रिमंडळात घेताना कोणाला घेवू नये, हे सुद्धा ठरवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
अण्णा हजारे मंत्र्यांना उद्देशून म्हणाले, तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार? देश कुठे जाणार आहे. मंत्रिमंडळात असताना आरोप झाल्यावर एक क्षणसुद्धा पदावर राहू नये. लगेच राजीनामा दिला पाहिजे. आरोप होताच मंत्र्यांनी प्रथम राजीनामा देवून बाहेर पडले पाहिजे. माझे वय ९० वर्ष झाले आहे. या ९० वर्षांचा वयात एकसुद्धा डाग नाही. तसेच जीवन मंत्रिमंडळातील लोकांनी जगले पाहिजे. त्यामुळे राज्याचे आणि देशाचे नुकसान होते. सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांना त्यांचे नेहमी आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजे. सुरवातीला हे चुकत आणि नंतर अशा घटना घडतात. त्यामुळे राज्याचे, देशाचे आणि समाजाचे नुकसान होते, त्याचा विचार करणे गरजेच असल्याची प्रतिकिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.