News: उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील मोंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी बँकेने कर्ज वसुलीच्या नावाखाली मानवतेला काळीमा फासणारी घटना घडवली आहे. अवघ्या ४०,००० रुपयांच्या कर्जासाठी बँकेने हप्ते न भरल्याच्या कारणावरून महिलेला पाच तास जबरदस्तीने बँकेत बसवून ठेवले आणि पतीला धमकी दिली की पैसे भरल्याशिवाय पत्नीला सोडणार नाही.
बमहरौलीतील आझाद नगर भागात राहणाऱ्या पूजा वर्मा या महिलेने खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. तिचा पती रविंद्र वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून पूजाला बँकेतच बळजबरीने बसवण्यात आले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत उरलेली रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत ती घरी जाऊ शकत नाही.
पती रविंद्रने तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून मदतीची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेची सुटका केली आणि दोघांना मोंठा पोलीस ठाण्यात आणले. पूजाने लेखी तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकार उघड केला. पूजाने एकूण ११ हप्ते भरल्याचा दावा केला आहे, पण बँकेने फक्त ८ हप्ते दाखवले. तिने स्पष्ट आरोप केला की, बँकेचे एजंट कौशल व धर्मेंद्र यांनी तिचे तीन हप्ते हडप केले. मध्य प्रदेशातील टिकमगढ येथील बँक सीओ संजय यादव यांनीसुद्धा त्यांच्या घरी येऊन पैसे भरण्यासाठी दबाव टाकल्याचे पूजाने सांगितले.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बँकेचे व्यवस्थापक अनुज कुमार यांनी स्पष्टीकरण दिले की, पूजा स्वतःच बँकेत आली होती आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आली नव्हती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, दोन्ही बाजूंच्या म्हणण्यानुसार सखोल तपास सुरू केला आहे. “तपासाअंती दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल”, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.