जामखेड । नगर सहयाद्री :-
जामखेड शहरातील कापड दुकानचे मालक दुकान बंद करून दोन लाख रुपये असलेली पैशांची बँग घेऊन घरी जात असताना घराचे गेट उघडताना डोळ्यात मिरचीची पावडर टाकून बँग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखून अंदुरे यांनी एका हातात एका चोराचा हात व एका हातात बँग पकडून आरडाओरडा केल्यानंतर शेजारी आले. पकडलेल्या चोरास पोलीसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळाले माहिती अशी की, शनिवार दिनांक 22 रोजी शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे हे नेहमीप्रमाणे आपले कापड दुकान रात्री साडेनऊच्या आसपास बंद करून व सोबत दोन लाख रुपये असलेली पैशांची बॅग घेऊन स्कुटी वरून जामखेड शहरातील राजमाता जिजाऊ नगर येथील घराकडे निघाले होते. यावेळी पाळत ठेवलेल्या या तीन आरोपींनी ते घराजवळ गेले असता गेट उघडत असतानाच बँग हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता यातील करण सुदाम चव्हाण रा. आरोळे वस्ती जामखेड या आरोपीने त्याच्या सोबत असलेली मिरचीची पूड त्यांच्या डोळ्यात फेकली.
यातील एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यात अडकवलेली दोन लाख रुपयांची पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला या झटापटीत फिर्यादी सागर अंदुरे यांनी प्रसंगावदान राखून यातील करण सुदाम चव्हाण या आरोपीला पकडून ठेवले. यावेळी दुसरे दोन जण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होती मात्र सागर अंदुरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला राहत असलेले लोक धावत आले. मात्र त्यापूवच यातील अनोळखी दोघेजण पळून गेले. यानंतर पकडून ठेवलेल्या आरोपीला घटनास्थळी पोलिसांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला पकडलेल्या आरोपीसह एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.