जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड तालुक्यातील शिऊरफटा येथील सात बारा हॉटेलमध्ये किरकोळ वादातून वेटरने लाकडी काठीने केलेल्या मारहाणीत ज्योतीराम शामराव काशिद (वय ३६, रा. काशिद वस्ती, सारोळा) याचा मृत्यू झाल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात दीपक गुलाबराव सातपुते (रा. मनमाड, जि. नाशिक) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत ज्योतीराम काशिद १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मोबाईलवर बोलत घराबाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने सकाळी शोध घेतला असता शिऊरफटा येथील सात बारा हॉटेलमध्ये त्याला काठ्यांनी मारहाण झाली असून तो गंभीर जखमी झाला असल्याची माहिती फिर्यादी मयताचे भाऊ लक्ष्मण शामराव काशिद यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी वेटर दीपक सातपुते यास विचारणा केली असता त्याने मीच ज्योतीरामला मारले अशी कबुली दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पो.ना. रविंद्र वाघ, पो.कॉ. देवीदास पळसे, नवनाथ शेकडे, गणेश काळाने, कुलदीप घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.