Politics News: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी हिंगोलीचे खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट फोन केला आणि या एका फोनमुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
विशेष बाब म्हणजे, याच दिवशी २७ जुलै रोजी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही ६५ वा वाढदिवस होता. मात्र, अमित शाह किंवा भाजपच्या इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे ‘अमित शाहांचा हा फोन केवळ औपचारिक होता की त्यामागे काही रणनीती होती?’ हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागेश पाटील आष्टीकर यांच्या कार्यकर्त्यांनी अमित शाहांच्या फोनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हिंगोलीत शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपच्या गोटात या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षातील खासदाराला थेट फोन करणं हे काहीसं अपवादात्मक मानलं जात असून, त्यामुळे या फोनमागे राजकीय संकेत लपले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्धव ठाकरे गटातील काही खासदार ‘नाराज’ असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. नागेश पाटील आष्टीकर यांना दिलेल्या शुभेच्छा ही त्याच रणनीतीचा भाग असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी देखील आष्टीकर यांना स्वतः शुभेच्छा दिल्या असून, त्यांचाही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. त्यामुळे हा राजकीय संवाद ‘शक्तीप्रदर्शन’ की ‘संघर्षाची सुरुवात’ हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.