किंगमेकरच्या भूमिकेत विखे परिवार | युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संघटन कौशल्यासह उत्तम संयोजनाची अमित शहांनाही पडली भुरळ
सारिपाट / शिवाजी शिर्के
राजकारण गल्लीतील असो कि दिल्लीतील! विखे पाटील यांच्या नावाची चर्चा झडली नाही असे होतच नाही. कोणाचा विजय झाला तरी आणि पराभव झाला तरी त्याच्या मागे विखे पाटलांचेच नाव आतापर्यंत जोडले गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्पष्टपणे अधोरेखीत झाले. जिल्ह्याची राजकीय चावी हातात आली असताना आणि राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका असतानाही अत्यंत संयमी भूमिका घेणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वावर आणि संघटनकौशल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले भाष्य बरेच बोलके ठरले आहे. गत विधानसभा निवडणुकीत संगमनेर, पारनेर आणि नेवासा या तीन तालुक्यात विखे पाटलांचे सुदर्शन चक्र फिरले आणि अनेकांचे निकाल त्यांनी लावून टाकले. डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेचं उट्टं काढलं असे म्हटले जात असले तरी त्याहीपेक्षा किंगमेकरच्या भूमिकेत आता सुजय विखे पाटलांची भर पडलीय हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज राहिलेली नाही.
कार्यक्रम अथवा बैठका कोणत्याही असो. त्याचे उत्तम आणि अतिशय चोख नियोजन करण्याची यंत्रणा विखे पाटलांकडे कायम तत्पर असते. जबाबदाऱ्या अशा वाटून दिलेल्या असतात की नवख्या पाहुण्याला काहीच सुचणार नाही. पंतप्रधान, राष्ट्रपतींपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणाचीही सभा असली तरी ती यशस्वी करुन दाखविण्याची आणि त्या माध्यमातून जिल्ह्याच्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचे कसब फक्त विखे पाटलांनी अनेकदा दाखवून दिले. देशाचे गृहमंत्री आणि सहकारी मंत्री असणारे अमित शहा यांचे राजकीय वजन आणि त्यांच्या शब्दाला असणारी किंमत सर्वश्रूत! काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाच्या गोटात दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचे अमित शहा यांच्याशी असणारी थेटे हॉटलाईन लपून राहिलेली नाही. विखे पाटलांना याचा फायदा जसा झालाय तसाच त्याचा तोटा देखील! राज्याच्या राजकारणाचा विचार करता त्यांना मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणूनच ओळखले जाते.
अमित शहा यांचा शिड दौरा निश्चित झाल्यानंतर शहकाटशहाच्या राजकारणात त्यांचा कोपरगाव दौराही ठरविला गेला. हा दौरा ठरवला जात असताना विखे पाटलांना याची माहिती मिळूनही त्यांनी त्यास हरकत घेतली नाही. मात्र, हे सारे करताना कोपरगावपेक्षा शिडचा दौरा उजवा कसे ठरेल आणि त्यातील नियोजनात त्रुटी राहणार नाही याची पुरेपूर काळजी विखे पिता- पुत्रांनी घेतली. त्यातही प्रवरा कारखान्याचे चेअरमन असणाऱ्या डॉ. सुजय विखे यांची भूमिका आणि त्यांचे नियोजन सर्वांचीच दाद मिळवून गेले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सुजय विखे पाटील यांच्या संघटनकौशल्याचे जाहीर कौतुक केले. शिडत मुक्कामी आल्यापासून ते दिल्लीकडे माघारी जाईपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना अमित शहा यांनी तीनदा वाहनातून खाली उतरून विखे पाटलांचे आदरातिथ्य स्वीकारले. देशाचा गृहमंत्री त्यांच्या वाहनातून तब्बल तीनदा खाली उतरतो ही साधी गोष्ट नक्कीच नाही. देशाचा गृहमंत्री मतदारसंघात येत असताना त्यांच्या स्वागतामध्ये, आदरातिथ्यात काही कमी पडायला नको याची काळजी विखे पिता-पुत्रांनी घेतली. पंचवीस- तीस हजारांपेक्षा जास्त जनसमुदाय सभेला उपस्थित राहिला हे विशेष!
अमित शहा यांचे शिडत आगमन होण्याच्या काही तास आधी राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये व्यस्त राहिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी या साऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. अमित शहा दिल्लीकडे रवाना होताच दुसऱ्याच दिवशी त्यांनी संगमनेर तालुका गाठला. जोर्वे हे ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे गाव! त्या गावात दाखल होत विखे पाटलांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना दिलासा देण्याचे काम केले. अतिवृष्टीच्या संकटात विखे पाटलांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. कधी दुचाकीने तर कधी चार चाकीने! जोडीने अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचेल याचे नियोजन! न थकता काम करत राहण्याचा खरे या कुटुंबाचा पिंडच!
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत निर्णायक भूमिका घेत मुत्सद्दीपणा सिद्ध केलेल्या विखे पाटलांचे व्हिजन कायमच जनतेच्या हिताचेच असल्याचे अनेकदा अधोरेखीत झाले. राज्यासह स्वत:च्या जिल्ह्यात विकास कामांचा वेगळा दूरदृष्टीपणा, त्याचा आराखडा आणि प्रशासनातील सर्व घटकांना संयमी आणि विश्वासात घेत केले जाणारे काम जनतेच्या चर्चेचा विषय ठरत आले आहेत. गत विधानसभा निवडणुकीत संगमनेर, पारनेर आणि नेवासा या तीन तालुक्यात विखे पाटलांचे सुदर्शन चक्र फिरले आणि अनेकांचे निकाल त्यांनी लावून टाकले. डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेचं उट्टं काढलं असे म्हटले जात असले तरी त्याहीपेक्षा किंगमेकरच्या भूमिकेत आता सुजय विखे पाटलांची भर पडलीय हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. येणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राहणार हे नक्की!
कारखान्यांच्या काटामारीवर बोलणारे पहिले मुख्यमंत्री
साखर कारखान्यांच्या वजन काट्यावर काटा मारला जातो हे सर्वश्रूत आहे. राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत असणाऱ्या अनेकांना हे माहितीय! त्यातील काहींचे स्वत:चे कारखाने आहेत. मारलेला काटा आणि त्यातून चोरले जाणारे पैसे कसे आणि कोणाच्या खात्यावर जमा होतात हेही स्पष्ट आहे. साखर कारखान्यांमधील ही चोरी जगजाहीर असताना त्यावर भाष्य करण्याची हिम्मत कोणीच दाखवली नाही. देवेंद्र फडणवीस हे त्याला अपवाद ठरले. किरकोळ दुकानदाराचा वजनकाटा तपासून त्यातील चोरी शोधत त्याच्याकडून चिरीमीरी घेणारा वजन-मापे अधिकारी कधी कोणत्या साखर कारखान्याचा वजन काटा तपासायला गेला आणि त्यात त्रुटी आढळून आल्या अशा बातम्याही कधी समोर आल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलेच आहे तर आता कारवाई देखील झाली पाहिजे!