अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
नगरमध्ये दि.२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात शाहू मोडक नगरीत सायंकाळी सहा वाजता रंगणार आहे. या संमेलनानिमित्त नगरच्या कलाकारांनी नांदी आणि स्वागतगीताची निर्मिती केली आहे. संमेलन स्थळी १०० कलाकार नांदी सादर करणार आहेत. रविवार दि. २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता भव्य नाट्य दिंडीही काढण्यात येणार आहे. प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, माऊली सभागृह ते पेमराज सारडा महाविद्यालय प्रांगण संमेलन स्थळी ही नाट्य दिंडी दाखल होईल.
नांदी म्हणजे ईश्वराचे स्तवन, मंगलाचरण असणारी एक प्रकारची लोककला आहे. नाटकाचा प्रयोग सुखरूप पार पडावा म्हणून नाट्यारंभी नांदी म्हटली जाते. १०० व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनासाठी नगरच्या मंगल पाठक लिखित आणि ऋतुजा पाठक यांनी संगीतबद्ध केलेली विशेष नांदी दि. २६ जानेवारी रोजी पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता संमेलन उद्घाटनप्रसंगी निनादणार आहे. संमेलनप्रमुख क्षितिज झावरे यांची संकल्पना असलेले सुप्रिया ओगले दिग्दर्शित स्वागतासाठी १०० नृत्यांगनांचा नृत्याविष्कार यावेळी पहायला मिळेल.
संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे विश्वस्त व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे विश्वस्त व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.
उदघाटनानंतर सायंकाळी ७ वाजता अभिनेत्री मानसी नाईक, माधवी निमकर, विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, गायिका सन्मिता धापटे – शिंदे, गायक राहुल सक्सेना व चंद्रशेखर महामुनी, अभिनेते कमलाकर सातपुते, झी सारेगम फेम संदीप उबाळे, मयूर पालंडे, कविता जावळेकर हे कलाकार संगीत रजनी सादर करणार आहेत. नगरच्या या ऐतिहासिक नाट्य संमेलनात रसिकांनी आवर्जून सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, निमंत्रक आमदार संग्राम जगताप, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, उपनगर शाखेचे अध्यक्ष -प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाहक चैत्राली जावळे, मध्यवर्ती कोषाध्यक्ष सतीश लोटके, मध्यवर्ती नियामक मंडळ सदस्य संजय दळवी, अहिल्यानगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, कोषाध्यक्ष जालिंदर शिंदे, मार्गदर्शक पी. डी. कुलकर्णी, प्रसिद्धीप्रमुख अविनाश कराळे आदींनी केले आहे.